नाशिक | Nashik
जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत आज (बुधवार) सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया पार पडत असून मतदानासाठी (Voting) मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सकाळी नऊला ६.९३ टक्के अकरा वाजता १८.८२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात ३२.३५ टक्के मतदान झाले आहे. एकीकडे मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तर दुसरीकडे विविध मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रणांत बिघाड झाल्याचे समोर येत आहे. अशातच इगतपुरी मतदारसंघातील एका मतदान केंद्रांवर चक्क दुसऱ्या उमेदवाराला मत मिळत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी नगरपरिषद (Igatpuri Municipal Council) हद्दीतील तळेगाव येथे उमेदवारला मतदान केले तर दुसऱ्याच उमेदवाराला मत मिळत असल्याची अफवा पसरली होती. मात्र या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अभिजीत बारवकर यांनी स्वतः पथकासह येऊन पडताळणी केली असता असा कुठलाही प्रकार घडलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्या मतदाराचे बॅलटवरही मतदान घेण्यात आले.
दरम्यान, दुपारी १ वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात ४३.२९ तर सर्वात कमी २७.३४ टक्के बागलाण मतदारसंघात झाले. तर नांदगाव मतदारसंघात ३०.१६ टक्के, मालेगाव मध्य ३५.८२ टक्के, मालेगाव बाह्यमध्ये २७.७६ टक्के, कळवण ३६.१५ टक्के, चांदवड ३४.१९ टक्के, येवला ३५.८६ टक्के, सिन्नर ३६.४० टक्के, निफाड ३१.८० टक्के, नाशिक पूर्व २८.२१ टक्के, नाशिक मध्य ३०.२७ टक्के, नाशिक पश्चिम २८.३४ टक्के, देवळाली २८.१९ टक्के,इगतपुरी ३४.९८ टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण ३२.३५ टक्के मतदान झाले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा