नाशिक | प्रतिनिधी Nashik
बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील पेशाने डॉक्टर असलेल्या आणि मुंबईत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चैतन्य बागुल या नवोदित अभिनेत्याने अनेक शिखरे गाठली आहेत….
मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न म्हणजे आपल्या मुलांनी खूप शिकावे व मोठ्या पदावर नोकरी करावी असेच काही असते. याच मानसिकतेतून बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील तरुणाने आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी वैद्यकीय शाखा निवडून डेंटिस्टची पदवी घेतली. एका शिक्षकाच्या कुटुंबातून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
परंतु, लहानपनापासून चैतन्यला अभिनेता व्हायचं होतं. लहानपणापासून त्याच्यात सुप्त अवस्थेत असलेल्या अभिनयाच्या गुणामुळे या तरुणाने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज चैतन्य मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. तालुक्यासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा यानिमित्ताने खोवण्यात चैतन्यला यश आले आहे.
चैतन्यच्या आई-वडिलांनाही आधीच कल्पना होती की हा त्याचे अभिनयाचे क्षेत्रा काही सोडणार नाही. मात्र आधी शिक्षण मग ही बाकीचे असे सांगून चैतन्यला त्यांनी शिकवले…मोठे केले. डॉक्टर केले.
याकाळात चैतन्यने अगदी मनापासून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले त्याच वेळी छोटी-मोठी जी भूमिका मिळेल ती साकारण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु ठेवले. एका रात्रीत डॉ. बागूल महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कधी रंगमंच, तर कधी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचला समजलेच नाही.
नाशिकमधील अनेक नामवंत कलाकार मंडळी व कला जोपासणाऱ्या संस्थांसोबत अनेक यू-ट्यूब पट किंवा गाण्याच्या तसेच बऱ्याच नाट्यकलाकृतीच्या माध्यमातून चैतन्यचा चेहरा हळूहळू रसिक मनाच्या पटलावर विराजमान होऊ लागला.
दरम्यानच्या काळात नाशिकमध्ये शुटींग झालेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत चैतन्यला संधी मिळाली. यामध्ये विक्क्याची भूमिका चैतन्यने साकारली. चैतन्य घराघरात पोहोचला. संपूर्ण बागलाण तालुका हा तर आपला विक्क्या म्हणत ओळखू लागले.