Wednesday, May 29, 2024
Homeब्लॉगसन्मान एका सेवाव्रतीचा

सन्मान एका सेवाव्रतीचा

“बैठे बैठे सावधान ! योग स्थिती एक.. दोन.. तीन.. चार….” अशी घोषणा एखाद्या शिक्षकाने दिली की, आजही आपसूकच आठवण होते श्री. रमेश देशमुख सरांची !

अनेक अर्थाने कर्तृत्ववान शिक्षकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयातील अनेक नामवंत शिक्षकांपैकी श्री.रमेश विनायक देशमुख हे एक नाव आहे. एक जानेवारी रोजी त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या वयातही त्यांच्या वागण्या बोलण्यातून उत्साह ओसंडून वाहत असतो.तब्येत ईश्वर कृपेने ठणठणीत! स्वतः दुचाकीवरून ये जा करणार,लिफ्टचा वापर न करता एखाद्या विशीतल्या तरुणासारखं भरभर जिने चढणार, शहर आणि शहराबाहेर अनेक कार्यक्रमांना आणि परिचितांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी हजेरी लावणार, स्वतः उपस्थित राहणे शक्य झाले नाही तर स्व-हस्ताक्षरातील सदिच्छा आणि भेटवस्तू पाठविणार, फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार. त्यांच्या बोलण्यातला.. संवादातला उत्साह, आनंद आणि आपुलकी माणसे जोडण्यासाठी सेतूचं काम करतो. वाटते कोठून एवढी ऊर्जा मिळत असेल त्यांना या वयातही!

- Advertisement -

पहाटे उठून योगा, प्राणायाम,नित्य पूजापाठ, उपासना, नाश्ता, वाचन लेखनाने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. अगदी शालेय जीवनापासून त्यांचा हा दिनक्रम! त्यात क्वचितच खंड पडला असावा. सकाळ सायंकाळ मोकळ्या हवेत फिरणे, मित्रांशी परिचितांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या की, त्यांना ऑक्सिजन मिळतो.कायमच साधा, परंतु नीटनेटक्या पोशाखात सर आपल्या दृष्टीस पडतात.आरोग्यदायी दिनचर्येमुळे त्यांना कधी कमरेला बेल्ट वापरण्याची गरज पडली नसावी! आळस त्यांच्या अवतीभवती फिरकत नसावा. कार्यक्रमात किंवा इतरही वेळी कोणी भेटल्यास त्यांच्या पाठीत एक आपुलकीचा धपाटा घालणार … “काय कसे आहात ? बरे आहे ना..? त्या ठिकाणी…” समोरचा अत्यंत विनम्रतेने सरांच्या पायी नतमस्तक होणार. लहान असो वा मोठा साऱ्यांशी संवाद साधणं हा त्यांचा आवडीचा छंद. पहाटेचा गार वारा जसा तन मनाला आल्हाद देऊन जातो,तसा सरांचा संवाद समोरच्याचा चेहरा आणि मन प्रफुल्लित करून जातो.

सरांचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील शेवगाव असले तरी ते जन्माने नाशिककर आहेत. त्यांचे वडील श्रीमान विनायक मोहिनीराज देशमुख एक उत्तम गवई होते. ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक होते. तसेच एक नामांकित वकील म्हणून त्यांची ख्याती होती. सरांच्या मातोश्री सौ. कावेरीबाई या मूळच्या नाशिकच्या,त्या काळातील प्रख्यात ज्योतिर्विशारद घोलप घराण्यातील. श्रीमान विनायक आणि श्रीमती कावेरीबाई यांच्या नऊ अपत्यांपैकी श्री.रमेश देशमुख हे तिसरे अपत्य. अत्यंत सुखवस्तू आणि संस्कारक्षम कुटुंबात त्यांचा १९४१ साली इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या तारखेला जन्म झाला. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या राजेबहाद्दरवाड्यात भरणाऱ्या प्राथमिक शिक्षण मंदिर येथे त्यांचे प्राथमिक व पुढे पेठे विद्यालयात मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. पेठे हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना संस्थेच्या संस्थापकांपैकी नानासाहेब अभ्यंकर त्यांना इतिहास विषय शिकवत. श्रीमान मराठे सर गणिताचे धडे देत. श्रीमान ब. चिं. सहस्रबुद्धे,पु.रा. वैद्य, अण्णासाहेब परांजपे, रा.ग. वीरकर, गो.प्र.मुठे,रा.दा. रानडे, रामभाऊ क्षीरसागर इ. नामवंत शिक्षकांच्या वर्गात बसण्याचे भाग्य देशमुख सरांना लाभले.समर्पणाच्या भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षकांचा संस्कार त्यांच्यावर झाला. आपण पुढे शिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकलो, ते पेठे विद्यालयातील निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा वारसा लाभल्यामुळेच,हे सांगताना देशमुख सरांचा उर भरून येतो .

नाशकातील नामवंत डॉ. भरत केळकर यांचे वडील श्रीमान नानासाहेब केळकर हे जिल्हा स्काऊटचे कमिशनर असल्याने ते स्काऊटचे ट्रेनिंग देत. त्याकाळी स्काऊटच्या जांबोरीसाठी लंडनला जाण्याचा योग शालेय जीवनात आला.परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी एन.सी.सी., पूर्वीचे ए.सी.सी.या विषयात विशेष रस घेतला. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी एच.पी.टी. महाविद्यालयात घेतले.शालेय जीवनातच त्यांच्यावर शिस्तीचे संस्कार झाले. एफ.वाय. बी. ए. च्या वर्गामध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी न्यू हायस्कूल म्हणजे आजच्या बिटको हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एन.सी.सी. ट्रेनर म्हणून शिकवण्याची संधी तात्यासाहेब शिरवाडकर यांचे मानसपुत्र श्री.वसंतराव करपे सरांच्या मुळे त्यांना मिळाली. सकाळी कॉलेज आणि दुपारी एन.सी.सी. ट्रेनर म्हणून न्यू हायस्कूल मध्ये साधारणपणे ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत काम केले. नाशकातील प्रख्यात शल्यविशारद डॉ. जयंत सोहनी हा एन.सी.सी. मधील माझा पहिला विद्यार्थी हे सांगताना एका गुरूच्या चेहऱ्यावरील अभिमानाचा भाव सहज दिसून येतो.

१९६३ साली ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत देशमुख सर न्यू हायस्कूल मध्ये कार्यरत राहिले. शाळेत असतानाच पेठे हायस्कूल मधील नामवंत शिक्षक श्री.बाळासाहेब सहस्रबुद्धे यांचा शिपायाकरवी निरोप आला. त्यांनी पेठेत नोकरीची ऑफर दिली. देशमुख सरांनी अत्यंत आनंदाने ती स्वीकारली .ज्या शाळेत शिकलो तेथे नोकरीची संधी सर्वांच्याच वाट्याला येते, असे नाही.ते भाग्य देशमुख सरांना प्राप्त झाले १९६३ ते १९९९ पर्यंत सरांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीत शिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. शिक्षकांसाठी आवश्यक एस.टी.सी. हा कोर्स त्यांनी बाळासाहेब सराफ आणि य.ह. मोहाडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. अध्यापन शास्त्राबरोबरच विद्यार्थी घडविण्याचे तत्त्वज्ञान त्यांनी शिकवलं.पुढे डी.पी.एड., बी.एड., एम. ए. चं शिक्षण त्यांनी घेतलं. शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.शारीरिक शिक्षणाचे ते शिक्षक असले तरी मराठी आणि इतिहास शिकविण्यात त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. मराठी साहित्य आणि इतिहास या विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. स्काऊट आणि एन.सी.सी.हे त्यांचे आवडते विषय होतेच ! पेठे हायस्कूलचे विद्यार्थी रिपब्लिक डे परेड साठी पहिल्यांदाच सरांच्या मार्गदर्शनाखाली निवडले गेले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रत्यक्ष भेट आयुष्यात अविस्मरणीय ठरली. ४० वर्षांच्या अध्यापकीय कारकिर्दीत असंख्य विद्यार्थी त्यांनी घडविले.त्याकाळी अभ्यासाबरोबरच पेठे हायस्कूल सांस्कृतिक आणि क्रीडाक्षेत्रात लौकिक मिळवून होते.सर स्वतः खो-खो, आट्यापाट्या, कबड्डी, क्रिकेटचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेत. विद्यार्थ्यांना भरपूर बक्षीस मिळत.खेळात अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला लौकिक प्राप्त करून दिला होता. त्याकाळी कबड्डीत श्री. बंडोपंत जोशी, श्री. शेरताटे, क्रिकेटमध्ये श्री.राजीव लेले,श्री.आगरकर, खो-खो मध्ये श्रीकांत रहाळकर शशांक मोहाडकर, श्री.मुठे ,श्री.ठिपसे, अरविंद पोतनीस, पोतले बंधू आघाडीवर होते.

शिक्षक म्हणून काम करीत असताना वि. त्र्यं.चांदोरकर, बाळासाहेब सराफ, स. न. गोसावी,य.ह.मोहाडकर इत्यादींचे नित्य मार्गदर्शन व सहवास त्यांना लाभला. ग. शं.डोंगरे, ग. वि. अकोलकर,गो.रा. बेळे, श्रीरंग गुणे, वासंती सोर,सौ. थत्ते मॅडम यांचे मार्गदर्शन अध्यापन शास्त्राचा अभ्यास करताना लाभले.उत्तीर्ण झाल्यावर त्याच महाविद्यालयात फिजिकल विषयाचे मार्गदर्शन करण्याची संधी त्यांना मिळाली.आपल्या संस्थेत सेवारत असलेले प्र.बा .घारपुरे, अरुण एकतारे,भा.द. गायधनी, श्रीमती राधिका राजपाठक, सौ.सरिता देशमुख यांचे देशमुख सर मार्गदर्शक बनले.

दरम्यानच्या काळात पुण्यातील संस्कृत विषयासाठी समर्पणाच्या भावनेने कार्यरत, संस्कारशील अशा सौ. सरिता यांच्याशी १९७१ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्या स्वतः रुंठा हायस्कूल मधून संस्कृत शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत.सेवानिवृत्तीनंतर अत्यंत तळमळीने सौ.देशमुख यांनी संस्कृत प्रचार प्रसाराचे काम निष्पृहपणे सुरू ठेवले आहे. त्यांनी नुकताच संस्कृत – मराठी शब्दकोशाची निर्मिती केली असून संस्कृत अभ्यासकांसाठी तो एकमेवाद्वितीय असा हा संदर्भ ग्रंथ आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.तरुण कर्तृत्ववान मुलाच्या आकस्मित – अपघाती निधनाने खचून न जाता सेवेचे घेतलेले व्रत देशमुख दाम्पत्याने अखंड सुरू ठेवले आहे. छोट्या – मोठ्या संकटांनी हतबल होणाऱ्यांसाठी ते आदर्श ठरावेत!. अत्यंत खेळकर, विनोदी स्वभाव, अभ्यासू वृत्ती, निरक्षिर विवेकबुद्धी, गुणग्राही स्वभाव असल्याने विद्यार्थ्यांवर सरांची छाप पडे. म्हणूनच शिस्तप्रिय असूनही त्यांच्या तासाला दांडी मारावी असे कोणाही विद्यार्थ्याला वाटले नाही. नाविन्यपूर्ण कवायती, विविधता त्यांच्या शिकविण्यात असे. भारतभर निघणाऱ्या सहली हा पेठे हायस्कूलचा नाविन्यपूर्ण उपक्रम… त्यात इतर सहकाऱ्यांबरोबर देशमुख सर सहभागी होत, नव्हे नेतृत्व करत.अत्यंत कमी खर्चात रेल्वेने भारत भ्रमणाची संधी पेठे हायस्कूलच्या त्या काळातील मुलांना मिळाली. त्याबरोबरच स . न.गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी देखील सहलींचे यशस्वी आयोजन त्यांनी केले. त्याकाळी सहल म्हणजे केवळ क्षेत्र भेटी होत नसत. बाळ भाटे सरांचे गाणे… प्रवासादरम्यान आणि निवासाच्या ठिकाणी मिळणारी मेजवानी असे. त्यामुळे ज्ञान आणि मनोरंजनाचा मिलाफ या सहलीच्या माध्यमातून व्हायचा. गांधीनगर (नाशिक) ते मुंबई विमानसेवा सुरू झाल्यावर सवलतीच्या दरात पेठे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचा आनंद सलग सात दिवस घेता आला होता. अशा प्रसंगी शाळेतील विश्वासू कर्मचारी श्री. नाना नाईक, श्री. विठ्ठल पठाडे, श्री.वसंतराव कुलकर्णी यांची खास आठवण होते.

अध्यापनाबरोबरच नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी विशेष रस घेतला .शालेय जीवनापासून त्यांनी नाटकांत उत्तम भूमिका वठवल्या. पुढे बाळ भाटे सरांच्या ‘दिवाणी दावा ‘, ‘ तुझं नी माझं जमेना ‘ या नाटकांत त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या. कॉलेजमध्ये असताना तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या नाटकातही त्यांनी काम केले. तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या प्रयत्नांनी नाशिक मधील पेठे हायस्कूलमध्ये सुरू झालेल्या लोकहितवादी मंडळात जवळपास २८ वर्षे विविध पदांवर देशमुख सरांनी काम केले.त्याबरोबरच लोकहितवादी मंडळाच्या अनेक नाटकांत भूमिका केल्या. पेठेत अध्यापक आणि लोकहितवादी च्या माध्यमातून नाटकातून काम यामुळे महाराष्ट्रभर भ्रमंती करण्याचा योग त्यांना आला. अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला.तात्यासाहेब शिरवाडकरांचा शुभाशिष प्राप्त झाला.त्यानिमित्ताने अनेक नामवंत कलाकार मंडळी पेठे हायस्कूलच्या रंगमंचावर कला सादर करण्यासाठी येऊन गेले. त्यांत पं. भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, माणिक वर्मा, मल्लिकार्जुन मन्सूर,राम मराठे, प्रभा अत्रे इत्यादी अनेक दिग्गजांनी पेठे हायस्कूलच्या सभागृहात गायनाचे कार्यक्रम केले. बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे भाई अर्थात पु. ल. देशपांडे, संगीतकार वसंत देसाई, येऊन गेले. तात्यासाहेब शिरवाडकर यांचे ऑथेल्लो,राजमुकुट इत्यादी गाजलेल्या नाटकांच्या तालमी पेठेच्या रंगमंचावर जवळून अनुभवण्याचा योग सरांना प्राप्त झाला.खरे तर पेठे हायस्कूलच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार होण्याचं भाग्य त्यांना लाभलं!

अशा सांस्कृतिक आणि शैक्षणिक वातावरणात त्या काळातील विद्यार्थी घडत गेले. प्रख्यात नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्याशी सरांचा स्नेह होता.ज्येष्ठ कादंबरीकार रणजीत देसाई, शांताबाई शेळके, यशवंत देव, वीणा देव, विसुभाऊ बापट, रामचंद्र देखणे, आनंद माडगूळकर इत्यादी नामवंत लेखक व त्यांना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना या काळात प्राप्त झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांत सक्रिय असूनही मूळ शिक्षकी पेशाला त्यांनी न्याय दिला. शाळेत विद्यार्थी हिताकरिता मिळेल ते काम स्वीकारले.पूर्वतयारी करून विद्यार्थ्यांना शिकवले. सहकार्याशी भांडण- तंटे, राग- लोभ, ईर्षा यांपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले. शिक्षण कायद्याची पारायणे त्यांनी केली. कारण शिक्षक संघटनेतही ते सक्रिय सहभागी होते. “अभ्यासोनी प्रकटावे ” या न्यायानुसार प्रत्येक बाबींचा त्यांनी स्वतः अभ्यास करून इतरांना मार्गदर्शन केले. शिक्षक- पालक यांच्यातील विद्यार्थी हिताचा सुसंवाद शाळेसाठी उत्कर्षाचा मार्ग असल्याचे देशमुख सर मानतात.

श्री.देशमुख सरांच्या सुविद्य पत्नी सौ.सरिता देशमुख यांनी सुरू केलेल्या संस्कृत भाषा सभेत स्वतः देशमुख सर गेली अनेक वर्षे कार्यरत असून २०१५ पासून संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. नाशिक मधील श्रीकाळाराम मंदिर,श्रीकैलास मठ, इत्यादी संस्थांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे संयोजन सर आनंदाने करतात.योग विद्या धाम,श्रीविष्णू संगीत विद्यालय,गांधर्व महाविद्यालय, वसंत व्याख्यानमाला इत्यादी संस्थांशी सर संबंधित आहेत. सेवानिवृत्तीनंतर लोकज्योती जेष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी अनेकविध उपक्रम त्यांनी राबविले. २००६ ते २०१५ या काळात श्री.देशमुख सर लोकज्योती जेष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष देखील होते. दरम्यान महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव पद त्यांनी कौशल्याने भूषविले. सार्वजनिक वाचनालयाच्या शिक्षक गौरव समितीचे अध्यक्षपदावर देखील सर कार्यरत होते. सेवेत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही शतक महोत्सव पूर्ण करणाऱ्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळावर विविध पदांवर त्यांनी काम केले आणि संस्था व शाळेच्या प्रगतीत हातभार लावला. १९७५ ते १९८१ या काळात सर संस्थेचे कार्यवाह तर पुढे संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व केले. शास्त्रीय संगीत, नाट्य, सामाजिक सेवेची आणि विशेषता भ्रमंतीची आवड असणाऱ्या देशमुख सरांना अनेकविध संस्थांनी गौरविले आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात निपुण असलेल्या देशमुख सरांना नुकताच संस्थेचे माजी अध्यक्ष तथा मा. आ.बापूसाहेब उपाध्ये स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ही अवघ्या नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! श्री.देशमुख सरांना निरामय आयुष्य लाभो हीच सदिच्छा !

लेखन : शैलेश पाटोळे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या