
पेठ | प्रतिनिधी | Peth
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या प्रतिबंधित गुटखा (Gutkha) तस्करीला पेठ पोलिसांचे अभय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. गुटखा तस्करीतील सहभागाचा धागा पकडून, त्या बदल्यात ९० हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना पेठ पोलीस (Police) ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून खाकी वर्दी पुन्हा एकदा बदनाम झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज गायकवाड असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस वाहन चालकाचे नाव आहे. लाचखोर कर्मचारी आणि तक्रारदार यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. अखेर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. ज्या दिवशी ‘एसीबी’ने पेठ बायपासवर सापळा रचला, त्याच दिवशी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने पेठ मार्गे नाशिककडे (Nashik) जाणारा संशयास्पद टेम्पो (क्र. एमएच ०३ ईजे ९१९७) अडवला. या वाहनातून तब्बल १० लाख ४५ हजार ६८० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.
गस्ती पथकावर प्रश्नचिन्ह
गुटखा पकडण्यात आलेले ठिकाण पेठ पोलीस ठाण्यापासून (Peth Police Station) अवघ्या हाकेच्या अंतरावर होते. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी गुटखा वाहतूक पेठ पोलिसांच्या नजरेतून कशी सुटली? की ती सोयीस्कररीत्या सोडून देण्यात आली होती? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांच्या पथकाने ही धडक कारवाई केल्यामुळे, पेठ पोलिसांच्या विशेष गस्ती पथकाचा संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे.




