अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात गाजत असलेल्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट’ फसवणूक प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अरूण रामदास नंदन (रा. नाशिक) याने अपहार केलेल्या रकमेपैकी तब्बल 85 लाख रूपये नाशिक येथे गाळा (ऑफिस) खरेदीसाठी वापरल्याचे उघड झाले असून, ही रक्कम ग्रो मोअर फिनकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अॅक्सिस बँकेतील खात्यातून नाशिकच्या एका बिल्डरकडे ट्रान्सफर करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे. संबंधीत बिल्डरकडून 85 लाख रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून भूपेंद्र सावळे व इतरांविरूध्द शिर्डी व राहाता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अरूण नंदन याने कंपनीच्या निधीचा गैरवापर करून गाळा खरेदीसाठी व्यवहार केला होता.
सदर व्यवहारातील रक्कम ही गुन्ह्यातील अपहार रक्कम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी नाशिक येथील संबंधित बिल्डरशी संपर्क साधला. आर्थिक गुन्हे शाखेच्या दबावानंतर संबंधित बिल्डरने ती 85 लाख रूपयांची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात पोलिसांकडे जमा केली. यानंतर ही रक्कम पंचनामा करून तपासकामी जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची साखळी आणखी स्पष्ट होत असून, गुंतवणूकदारांच्या पैशांचा मागोवा घेण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तपासादरम्यान मिळालेल्या आर्थिक दस्तऐवजांचा आणि बँक व्यवहारांचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली आहे.




