नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘सन २०२२ मध्ये राज्यात झालेल्या सत्तानाट्यावेळी ‘पाचशे ते सहाशे कोटी रुपये’ (खोके) माझ्याकडेच होते. याच पैशांच्या कंटेनरमध्ये आठ-नऊ दिवस फिरत होतो’ अशी बतावणी अवैध सावकार रोहित कुंडलवालने नागरिकांसमोर करुन पैसे व व्याज ‘वसुली’ केल्याचे पोलीस (Police) सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, त्याच्या या दाव्यात तथ्य नसून या गोष्टींचा बनाव करुन त्याने अनेकांना गंडा घातला. त्याचे वडील व भाऊ अद्याप पसार असल्याने शोध पथके त्यांचा माग काढत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचा सरचिटणीस असलेला संशयित रोहित कैलास कुंडलवाल याच्यासह त्याचे वडील कै लास व भाऊ निखिल यांच्याविरुद्ध पंचवटी, नाशिकरोड, भद्रकाली व गंगापूर पोलिसांत खंडणी, खुनाच्या प्रयत्नासह विनयभंगाचे गुन्हे नोंद आहेत. त्यांनी संगनमताने मागील सव्वीस वर्षांपासून अवैधरिरित्या खासगी सावकारीतून नागरिकांकडून खंडणी ‘वसूल’ केल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, भद्रकाली पोलिसांच्या (Bhadrakali Police) कोठडीनंतर पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) रोहित याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली. रोहितने नागरिकांसमोर केलेल्या बतावणीसह दावे चौकशीत पुढे येत आहे. त्याने अनेक ‘बड्या’ पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांच्या नावे नागरिकांना धमकावून गंडा घातल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, रोहित याने सोशल मीडियावर भाजपचा पदाधिकारी असल्यासंदर्भात पोस्ट अपलोड केल्या आहेत. रोहितचे मंत्री गिरीश महाजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत फोटोही आहेत. मात्र, नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी कैलास पक्षात नसल्याचा दावा केला आहे.
रोहितचे दावे
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकत नाही. यासह धमकाविण्याचे दावे रोहितने केले आहेत. दरम्यान, कर्णिक यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. त्यासंदर्भातील उल्लेख फिर्यादीत नमूद आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री, मंत्री यांच्यासमवेत असलेले फोटो दर्शवून राजकीय पक्षात ‘विशेष वजन’ असल्याचे भासविण्याचा रोहित सातत्याने प्रयत्न करीत होता. या फोटोंसह मोबाइल फोनवरील ‘कॉल लॉग’ मध्ये मंत्रांच्या नावे असलेले संपर्क क्रमांक दर्शवून ‘बघा मी, इतका वेळ मंत्री महोदयांसोबत बोलतो’, असे दावे करुन त्याने अनेकांना गंडा घातला, असे समोर येते आहे.