नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राजस्थान (Rajasthan) येथील कोटा आयआयटीच्या नावे नाशिकच्या (Nashik) कॉलेजरोड (Collage Road) येथे कोचिंग क्लास सुरु करुन परप्रांतीय संचालकांनी पालकांकडून फाऊंडेशन कोर्स व फीच्या नावाखाली तब्बल दहा लाख ५४ हजार रुपये उकळून गाशा गुंडाळला आहे. ही धक्कादायक घटना अॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची स्कूल व्हॅन येणे अचानक बंद झाल्याने समोर आली असून याबाबत गंगापूर पोलिसांत (Gangapur Police) सात संशयित संचालकांवर फसवणुकीसह अन्य बीएनएस कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांनी गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावे विविध शाळांत परस्पर ‘कौन बनेगा रामानुजन’ ही स्पर्धा आयोजित करून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संपर्क करत आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला आहे.
जयसिंग मानसिंग भोजावत उर्फ चौहान, मानसिंग छोंगसिंग भोजावत उर्फ चौहान, नवरतन मानसिंग भोजावत उर्फ चौहा उर्फ कुंवर, दीपासिंग भोजावत उर्फ चौहान उर्फ भट्टी, सुरेंद्रसिंग मानसिंग भोजावत, उमा खुशबू सुरेंद्र भोजावत उर्फ कुंवर अशी संशयित क्लासचालक संचालकांची नावे आहेत. याबाबत भावना किरण भऊरकर (रा. मोहिनीराज बंगला, बडदेनगर, जुने सिडको) यांनी फिर्याद दाखल केली आहे. भऊरकर या गंगापूर शिवारातील मुक्त विद्यापीठात नोकरीस असून त्यांचा मुलगा अवधूत हा गोविंदनगर येथील एका शाळेत आठवीत शिक्षण (Education) घेतो आहे. याच शाळेत संशयितांनी जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत ‘कौन बनेगा रामानुजन’ ही स्पर्धा आयोजित केली.
त्यात अवधूत उत्तीर्ण झाल्याने संशयितांनी कोटा आयआयटी अॅकेडमी कोचिंग क्लासमधून भावना यांना संपर्क केला. त्यानंतर त्यांना कॉलेजरोडवरील कृषीनगर लेनमध्ये असलेल्या क्युबाईड बिजनेस सेंटर येथील क्लासला (Class) बोलावून अवधूतच्या यशाचे सर्टिफिकेट व भेटवस्तू दिली. त्यानंतर, संशयितांनी भऊरकर यांच्यासह इतर पालकांना क्लासच्या ‘स्कीम’ व डिस्काऊंट तसेच स्कॉलरशिपची माहिती देत विश्वास संपादन करुन अनेकांकडून अॅडमिशन, ट्यूशन फी, युनिफॉर्म फी, व्हॅन आणि टॅबच्या नावे ‘इन्स्टॉलमेंट’ नुसार ऑफलाईन व ऑनलाईन पैसे स्विकारले.
असे उकळले पैसे
जयसिंग चौहानने भऊरकर व अन्य पालकांना आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी क्लासबद्दल तसेच फाऊंडेशन कोर्सची माहिती दिली. त्यात ट्युशन व फाऊंडेशन कोर्सची एकूण फी १ लाख ६० हजार रूपये असल्याची माहिती दिली. जे विद्यार्थी या स्पर्धेत चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होतात, त्यांना अॅकडमी स्कॉलरशिप म्हणून फिमध्ये ७० टक्के सूट देते. त्यामुळे वार्षिक फी ४८ हजार रुपये आहे. यावर विश्वास बसल्याने भऊरकर यांनी ४८ हजार रुपये भरले. त्यांच्यासह इतर पालकांनी प्रवेश निश्चित केले.
अन् झोल झाला उघड
१५ एप्रिल २०२४ पासून हे क्लासेस सुरू झाले होते. परंतु, १२ जुलै रोजी अवधुत भऊरकर याला क्लासला नेण्यासाठी घरी व्हॅन आलीच नाही. म्हणून कुटुंबाने व्हॅनचालक गिरासे यांना संपर्क साधला असता त्यांनी क्लास बंद झाल्याचे सांगितले. हा धक्का बसताच पालकांनी संशयितांना फोन केले. पण सर्वच फोन बंद लागले. अधिक चौकशी केली असता, क्लासचे संचालक पसार झाल्याचे समोर आले. तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करत आहेत.