नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तपासावरच असलेल्या दोन भिन्न व गंभीर घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अखेर पोलीस आयुक्तालयाच्या नाशिकरोड गुन्हे शाखा युनिटला (Nashik Road Crime Branch Unit) यश आले. दोन घरफोडींच्या गुन्ह्यात ३४ लाखांचे तब्बल २९० ग्रॅम सोने सराईत चोरट्याकडून हस्तगत करण्यात आले असून दीपक पोपट आहिरे (५०, रा. वज्रेश्वरीनगर, पंचवटी) असे त्याचे नाव आहे.
अंबड पोलिसांच्या हद्दीत १५ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या घरफोडीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल होता. त्यात सुमारे १६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. तपासात एका संशयितास ताब्यात घेऊन पथकाने १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मात्र, गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार दीपक आहिरे हा पसारच होता. तपास सुरू असतानाच उपनगर हद्दीतील आनंदनगर येथे २५ जून २०२५ रोजी शौनक बंगल्यात घरफोडीची घटना घडली. त्यात १७० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते.
त्यानंतर गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. तेव्हा दोन्ही गुन्ह्यांची (Crime) पद्धत, पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून ही घरफोडी आहिरे यानेच करून नेपाळ बॉर्डई गाठल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या सूचनेने गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या निर्देशाने नाशिकरोड युनिटच्या प्रभारींच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले.
या पथकाने व श्रेणी उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे यांनी नेपाळ बॉर्डरवर लक्ष केंद्रित करून गोरखपूर येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या आहिरेची माहिती संकलित केली. त्याचवेळी तो कुशीनगर एक्स्प्रेसने नाशिककडे निघाल्याची माहिती मिळाली. यानंतर पवारांसह पथकाने नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर साध्या वेशात सापळा रचून आहिरेला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने शैलेंद्र तनपुरे यांच्या बंगल्यात शिरून घरफोडी केल्याची कबुली देत १५ लाख ६० हजार रुपयांची १३० ग्रॅम सोन्याची लगड पोलिसांना (Police) काढून दिली. आहिरेवर घरफोडी व चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.
तपास पथकाचे कौतुक
यशस्वी गुन्हे उकल केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तांत्रिक विश्लेषण शाखेच्या सहायक निरीक्षक जया तारडे, नाशिकरोड युनिटचे उपनिरीक्षक संदीप पवार, श्रेणी उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, दिलीप भोई, सहायक उपनिरीक्षक मंगला जगताप, हवालदार अविनाश देवरे, नितीन फुलमाळी दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, संजय पोटिंदे, अंमलदार भरत राऊत यांचा गौरव करून सत्कार केला व पथकास बक्षीस जाहीर केले.




