सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या विशेष पथकाने सिन्नर शहरातील (Sinnar City) लोंढे गल्ली भागात चालणाऱ्या अवैध अंमली पदार्थांच्या अड्ड्यावर छापा (Raid) टाकून जवळपास १० किलो गांजा, २२ किलो ६७० ग्रॅम भांग पावडर व १ लाख ९७ हजार ८१० रुपये रोख असा एकूण ५ लाख २३,९५० रुपयांचा ऐवज जप्त केला. हा अड्डा चालवणाऱ्या दोघांसह गांजा व भांग सेवन करताना सापडलेल्या १६ ग्राहकांना (Customers) ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले असून सराईत गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाभर कारवाई करण्यात येत आहे. अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाला सिन्नर शहरातील लोंढे गल्ली परिसरात अवैधरीत्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी छापा टाकला असता तेथे गांजा व भांग
पावडरची अवैधरीत्या विक्री करणारा अड्डा चालवण्यात येत असल्याचे उघड झाले. यावेळी ९.९४४ किलो गांजा, २२ किलो ६७० ग्रॅम भांग पावडर असे एकूण ३,२६,१४० रुपये अंमली पदार्थ (Narcotics) व रोख रक्कम असा एकूण ५,२३,९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा अड्डा चालवणारे गणेश प्रकाश गोळेसर (४४), श्रावण नारायण पगारे (३६, दोघेही रा. लोंढे गल्ली, सिन्नर) यांना पथकाने ताब्यात घेतले. यावेळी गांजा व भांग सेवन करताना आढळलेले जय सुनील सांगळे (१९, रा. वडगाव, सिन्नर), पूनाजी भरत भोईर (३५, रा. अकोले, जि. अहिल्यानगर), अजय राजू चव्हाण (२४, रा. विजयनगर, सिन्नर), दीपककुमार वर्मा (४०, रा. माळेगाव एम. आय. डी. सी., सिन्नर), शंभू शहा अशरफी शहा (४५, रा. लोंढे गल्ली, सिन्नर), मोनू रामके रवीन (१८, रा. माळेगाव एम.आय.डी.सी. सिन्नर), भरतकुमार नागेश्वर मेहता (३६, रा. माळेगाव एम.आय.डी. सी. सिन्नर), प्रकाश एकनाथ माळी (२०, रा. भाटवाडी, सिन्नर), अमोल किसन शिंदे (३५, रा. हरसुले सिन्नर), बिपेश शरद चौधरी (४२, रा. शिवाजीनगर, सिन्नर), चुलखे शरद देवराज (४८, रा. माळेगाव एम. आय.डी. सी.), भारत गोकुळ पाटील (२२, रा. शिवाजीनगर, सिन्नर), सुरेश रामचंद्र बिन्नर (४३, रा. पिंपळे, सिन्नर), किरण गजाबा लहामगे (४४, रा. शिवाजीनगर, सिन्नर), ओम नारायण थारू (३०, रा. आडवा फाटा, सिन्नर), रवींद्र भारत नाठे (३१, रा. गंगावेस, सिन्नर) यांनाही ताब्यात घेण्यात आले. या सर्वांविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉजिंगवर छापा
शहरातील उद्योग भवन परिसरतील हॉटेल न्यू सागर लॉजिंग या ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली. लॉजिंगमध्ये अक्षय राजेश गीते (२४, रा. कानडी मळा, सिन्नर) व नरेश उत्तमराव कच्छवे (३३, रा. कोककर कॉलनी, मानवात, जि. परभणी, हल्ली रा. भगूर, ता. जि. नाशिक) यांनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिला देहविक्रीकरता जागा उपलब्ध करून देऊन तिच्याकडून देहविक्री करून घेऊन, तिला अवैध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे उघड झाल्याने दोघांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यावर छापा, १४ ताब्यात
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहरातील सातपीर गल्ली परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर पथकाने छापा टाकत हा अड्डा उद्ध्वस्त केला. अड्डाचालक गणेश शंकर लोंढे याच्यासह मटका जुगार खेळणारे कचरू दामू कुवर, राजेंद्र बाबूराव वाघ, गुलाब शिवराम गुंजाळ, तौसिफ शब्बीर शेख, अशोक हरिचंद्र गुजर, किसन जगन्नाथ झगडे, नारायण सुरेश महाले, सुनील लक्ष्मण शिंदे, गणेश अर्जुन वायचळे, विठ्ठल नारायण कुवर, शिवा निवृत्ती झगडे, प्रदीप कचरू क्षीरसागर, प्रवीण कृष्णा क्षत्रिय (सर्व रा. सिन्नर) यांना ताब्यात घेण्यात आले. मटका, सट्टा जुगारासाठी पैशाच्या माध्यमाद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेले कल्याण, श्रीदेवी, टाईम नावाचे मटका जुगार संघटितपणे खेळताना व खेळवताना मिळून आलेल्या या सर्वांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल फोन व मटका जुगाराचे साहित्य, साधने असा एकूण ७५,५३४ रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.