नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सीबीआयसह (CBI) ट्रायमधून बोलत असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) नाशिक शहरातील (Nashik City) एका चार्टर्ड अकाऊंटंटला मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची धास्ती दाखवून तब्बल ४२ लाखांचा गंडा घातला आहे. दरम्यान, विविध बँक खात्यांत वर्ग झालेल्या ४२ लाख रुपयांपैकी १८ लाख रुपये फ्रिज्ड (गोठवणे) करण्यात नाशिक शहर सायबर पोलिसांना (Cyber Police) यश आले असून, संशयित चोरट्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. चार्टर्ड अकाउंटलाच आता गंडा घालण्यात आल्याने अनेक बड्या व्यावसायिक, ठेकेदार व उद्योजकांना धडकी भरली आहे.
नाशिक शहरात हा चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) कार्यरत असून त्याला सायबर चोरट्यांनी २ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत संपर्क साधला. आम्ही टेलिफोन रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) तसेच अंधेरीतील सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) कार्यालयातून बोलत असल्याचे व्हाटस् अॅप व मोबाईल क्रमांकांवरुन सांगितले. यासाठी, संशयित सायबर चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या (Police Officers) वेषात बसून व्हॉट्स अॅप व्हिडीओ कॉल व अन्य समाज माध्यमांतून चॅटिंग केली. तेव्हा त्यांनी सीएला ‘तुम्ही केलेल्या काही व्यवहारांत अनियमितता आढळली आहे, तुमचे आधार कार्ड व मोबाईलवरुन नरेश गोयल व तुमच्यात संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि पैशांची देवाण-
घेवाण मनीलॉन्ड्रिंगच्या पद्धतीने झाली आहे.
आता तुमची सर्वच कुंडली आमच्याकडे असून आतापर्यंतच्या तपासानुसार तुम्ही मनीलॉन्ड्रिंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. तुम्हाला होम अरेस्ट करणे गरजेचे आहे. त्यानुसार, आम्ही कारवाई केली आहे. यातून सुटका करावयाची असल्यास आम्ही जे सांगू ते करा; अन्यथा वीस ते ३५ वर्षांपर्यंच तुरुंगात राहून जीवन जगा, असा धाक दाखवला. यानंतर, चोरट्यांनी संबंधित सीएच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यातून ४२ लाख रूपये विविध बँक खात्यांत वर्ग करण्यात त्यास भाग पाडले. पैसे वर्ग होताच संशयितांनी मोबाईल नंबर बंद केले. कालांतराने फसवणूक झाल्याचे कळताच, सीएने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
तक्रारदार सधन, श्रीमंत
या प्रकरणात सायबर चोरट्यांनी सीएला बोगस अटक वॉरंट व अन्य कारवाईचे कागदपत्र दाखवले. त्यानुसार सीए धास्तावला. त्यामुळे त्याने पैसे वर्ग केले. दरम्यान, नाशिकमध्ये घडलेल्या अशा स्वरुपाच्या एकाही गुन्ह्यांत गोरगरीब व सामान्य कुटुंबातील तक्रारदारांचा समावेश नाही. ज्यांच्या सोबत असे गुन्हे घडले आहेत ते सधन आणि श्रीमंत कुटुंबातील आहेत. उच्च पदावरुन निवृत्त झालेले अधिकारी, प्रसिद्ध सीए, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक व बिल्डर या जाळ्यात अडकले आहेत.
१८ लाख गोठवले
सायबर पोलिसांना सीएची तक्रार मिळताच त्यांनी शेकडो बँक खात्यांच्या व्यवहारांची पडताळणी केली. तेव्हा चार, आठ, अठरा लाख व अन्य काही स्वरुपात ४२ लाखांची ही रक्कम ही पुणे, मुंबई, कोईम्बतुर, उत्तरप्रदेशातील काही संशयास्पद बँक खात्यांत वर्ग झाली. त्यानंतर मुंबई व पुण्यात कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांतून अनुक्रमे चार व चौदा असे एकूण १८ लाख रुपये सायबर पोलिसांनी गोठवण्यात (फ्रिज्ड) यश मिळवले आहे. संशयितांचा शोध सुरु आहे.
रियाज शेख,वरिष्ठ निरीक्षक, सायबर, नाशिक