नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मोबाईलवरुन (Mobile) शिवीगाळ केल्याच्या रागातून तिघा सराईतांनी संगनमताने ओळखीतील दोघा अल्पवयीनांसह त्यांच्या दोन तरुण मित्रांना (Friend) डांबून ठेवत मारहाण (Beating) केल्याची खळबळजनक घटना गस्तीवरील पोलीस वाहन गस्तीवरुन जात असल्याने उघड झाली. ‘जर नाईट राऊंडवरील पोलीस व्हॅन आलीच नसती’ तर, चारही मुलांसोबत विपरित घडण्याची शक्यता होती. मात्र, पोलीस वाहन (Police Vehicle) आल्याने तिघांनी पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, भद्रकाली पोलिसांना (Bhadrakali Police) तिघा सराईतांविरुद्ध स्वतःहून फिर्याद देत गुन्हा नोंदवून शोध सुरु केला आहे.
सागर कुमावत, ऋषि पगारे (दोघे रा. शितळा देवी मंदिराजवळ, अमरधाममरोड, जुने नाशिक) व शेखर राजेंद्र जगताप (रा. मोदकेश्वर वसाहत, काझी गढी) अशी संशयितांची नावे आहेत. (दि. २५) रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास तिघे संशयित आणि १४ वर्षीय दोन मुलांसह त्यांचे मित्र सौरभ जयप्रकाश पोतदार (वय १९, रा. मोदकेश्वर वसाहत, काझीगढी) आणि कृष्णा बळीराम चव्हाण (वय २१, रा. देवी मंदिराजवळ, चव्हाटा) हे पंचवटी अमरधाम जवळील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीलगतच्या सिक्युरिटी कॅबिनजवळ एकत्र जमून बोलत होते. त्याचवेळी संशयितांनी (Suspected) वरील दोघा अल्पवयीनांशी कुरापत काढून ‘मोबाईलवरुन तुम्ही शेखर जगतापला शिवीगाळ का केली’, असा वाद उकरुन काढत दमदाटी केली. यानंतर, चौघेही घाबरले असता, त्यांना जवळीलच सिक्युरिटी गार्डसाठी बनविलेल्या पत्र्याच्य शेडमध्ये तब्ब्ल अर्धा तास डांबून ठेवत प्लास्टिक पाईपने मारहाण केली.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार एक वाजता सुरु असतानाच, भद्रकाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, अंमलदार विशाल वाघ यांच्यासह पोलीसपथक नानावली, महालक्ष्मी चाळ, काझी गढी, अमरधाम रोड भागात पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग वाहन स्मशानभूमीजवळून हूटर सायरन वाजवून तसेच फ्लॅशर लाईट लावून मार्गस्थ होत असतानाच, संशयितांना पोलीस आल्याचे समजले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पत्र्याच्या शेडमधून पळ काढला. तेव्हा पोलिसांना संशयित पळून जात असल्याने नजरेस पडल्याने त्यांनी पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले. दरम्यान, याच पत्र्याच्या शेडमधून घाबरलेल्या अवस्थेत दोघा अल्पवयीनांसह तरुण बाहेर आले. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता, घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पथकाने या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांना कळवताच ते व डीबीचे पथक दाखल झाले. त्यानुसार, अधिक विचारणा करुन अंमलदार विशाल वाघ यांनी तिघांविरोधात फिर्याद दाखल केली असून तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.
शोधपथके रवाना
भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणातील (Case) सहभागी संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. तिघांपैकी कुमावत आणि पगारेविरोधात यापूर्वी मारहाण, चोरी व अन्य गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. पीडित दोघा अल्पवयीन मुलांचा ताबा पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सोपविला असून घटनास्थळावरुन प्लास्टिक पाईप व इतर साहित्य हस्तगत केले आहे.