नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तत्कालिन लेफ्टनंट कर्नलच्या (Lieutenant Colonel) नावे असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन (Land) चार ते पाच संशयितांच्या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारे नावावर करुन तिची थेट विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड (Nashik Road) परिसरातून समोर आला आहे. याबाबत, नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) संशयित विजय शिवाजी कंकाळ व त्याचे काही साथीदार (सर्व रा. चुंचाळे, अंबड, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत निवृत्त कर्नल विनायक बंकीम परीडा (वय ५५, रा. महानंदीविहार कॉलनी, कंटक, ओडीसा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
लेफ्टनंट कर्नल बंकिम बिहारी परीडा हे लष्करी सेवेत कार्यरत असताना, काही वर्षांपूर्वी त्याच्या नावे पाथर्डी शिवारातील सर्वे नंबर २०३/१/२/२/१/२/४ मधील प्लॉट नंबर ४४ मधील ३६० चौरस मीटर मिळकत होती. दरम्यान, २२ जानेवारी २०११ मध्ये त्यांचे निधन झाल्याने मिळकत पडून होती. तेव्हा काही महिन्यांनी या यासंदर्भान कंकाळ व संशयितांना मिळकतीची माहिती मिळाली. त्यांनी संगनमत करुन या जमिनीचे बनावट कागदपत्रे, सातबारा उतारा, मृत्यूपत्र बनविले.
त्याचवेळी १३ डिसेंबर २०२४ रोजी संशयितांनी संनमताने नाशिकरोड येथील हॉटेल नीलकंठेश्वर समोरील सर्व्हिस रोड येथे असताना कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांची दस्तनोंदणी व पुढील विक्री व्यवहार सहदुय्यम निबंधक ( वर्ग २) यांच्या कार्यालयात (Office) केले. यानंतर जमीन नावावर होताच, तिच कुणातरी खरेदीदारास विक्री केली, असे फिर्यादीत नमूद आहे. संशयितांना (Suspected) ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार आहे.
असे झाले उघड
बंकिम बिहारी परीडा हे सैन्यदलातील लेफ्टनंट कर्नल पदावरुन निवृत्त झाले होते. तर, सन २०११ मध्ये निवर्तले. त्याच कालावधीत त्यांचे चिरंजीव विनायक परीडा हे लष्करात कर्नल म्हणूण सेवा बजावत होते. दरम्यान, विनायक यांना वडील बंकिम बिहारी यांच्या नावे पाथर्डी शिवारात जमीन असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नाशकात येऊन चौकशी केली असता, जमीन अस्तित्त्वात आहे, परंतु तिची विक्री झाल्याचे कळाले. त्यांनी पाठपुरावा केला असता, वारसाहक्काने जमिनीवर त्यांचे नाव न लागता तिन्हाईतांचे नाव सातबारा उताऱ्यावर आढळले. विशेष म्हणजे या जमिनीची विक्री झाल्याचे समोर आल्याने त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.