नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड एमआयडीसीत (Ambad MIDC) समोरासमोर वर्कशॉप असल्याने झालेल्या ओळखीतून लघुउद्योजकाने एका वॉचमनकडून व्याजाने पाच लाख रुपये घेतले असता, त्याने सन २०१८ पासून आजतागायत उद्योजकाकडून तब्बल वीस लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे अधिकचे पैसे व व्याज वसूल करण्यासाठी संशयित वॉचमनने साथीदारांसह कर्जदाराचे अपहरण (Kidnapping) करुन त्याच्या पत्नीचा विनयभंग करुन मंगळसूत्र खेचून नेले.
त्यानुसार, अंबड पोलीस ठाण्यात सात संशयितांविरोधात (Suspected) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नितीन पाटील, त्याचा साथीदार तुषार व अन्य पाच संशयितांविरोधात गंगापूर रोडवरील ध्रुवनगरात राहणाऱ्या ५१ वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि. ३) फिर्याद दाखल केली आहे. त्यान्वये, पीडितेच्या पतीचा अंबड एमआयडीसीत लघुउद्योग आहे. त्यांच्या उद्योगासमोरच एक वर्कशॉप असून त्यात वॉचमनकी करणारा संशयित नितीन पाटील याच्याशी सन २०१८ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत ओळख झाली. त्यातून आर्थिक अडचण आल्याने पीडितेच्या पतीने ओळखीतील नितीनकडून तेव्हा व्याजाने पाच लाख रुपये घेतले.
त्यामुळे हे पाच लाख रुपये व त्याचे व्याज वसूल करण्यासाठी नितीनने कालांतराने दबावतंत्रासह दहशतीचा मार्ग निवडून पीडितेच्या पतीस शिवीगाळ करुन पैशांची मागणी केली. दरम्यान, पाच लाखांच्या मोबदल्यात नितीन व साथीदारांनी पीडितेसह पतीकडून वरील कालावधीत अवाजवी पद्धतीने तब्बल वीस लाख रुपये जबरीने उकळले. तरीही, आणखी व्याज शिल्लक असल्याचे सांगून पीडितेस मारहाण करुन विनयभंग करुन अपशब्द वापरले. तपास सहायक निरीक्षक दिलीप भंडे करत आहेत.
वसुलीसाठी कोयता, अश्लिलता
संशयिताने पीडितेकडे तगादा लावून ‘मला पैसे आणून दे’, असे बोलून तिच्याकडे वाईट नजरेने पाहून तिच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे मंगळसूत्र कोयत्याची धमकी दाखवून जबरीने हिसकावून नेले. तर, तिला व पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन दुसऱ्या दिवशी पुन्हाः साडेतीन लाख रुपये जबरीने काढून घेतले. यानंतर, गुन्हेगारी व दहशतीची परिसीमा गाठून व्याजाची अवाजवी रक्कम वसूल करण्याकरिता पीडितेच्या पतीस अंबड एमआयडीसीतील हल्सन कंपनीच्या बाहेरून अपहरण करत जबरीने दुचाकीवर बसविले. तेथून पाथर्डीफाटा भागात आणून वाहन थांबवून सर्वच संशयितांनी बुक्कीने व काठीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जबर जखमी केले.
पाच लाख रुपये आले कुठून?
आता वॉचमन असलेल्या नितीनची पूर्वी एमआयडीसीत एक कंपनी होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर, काही स्थितंत्यरे घडल्याने त्याला वॉचमनची नोकरी करावी लागली. त्याच कालावधीत त्याने सावकारी करण्याचे ठरवून पाच लाख रुपये पीडितेच्या पतीस दिल्याचे तपासात उघड होत आहे. त्यामुळे नितीनने पाच लाख रुपये कुठून आणले ? त्याने कशा पद्धतीने सावकारी चालविली, कंपनी कुणाची, तो नोकरीला होता का, या सर्वच बाबींचा तपास आता पोलीस करत आहे.
मुद्दे
- वीस लाख रुपयांसह मंगळसूत्र ओरबाडले
- सर्वच संशयित पसार; शोध सुरु
- जबरीने अठ्ठावीस चेक लिहून घेतले
- जाच असह्य झाल्याने पीडितेने घेतली पोलिसांत धाव
- वॉचमनकी करताना नितीनने व्याजाचा धंदा मांडला
- नितीनचे साथीदार बेरोजगार
- अनेक बँक खाते, व्यवहार पडताळणार