नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लॉकडाऊन काळात एसटी महामहामंडळाने (ST Corporation) ‘महाकार्गो’ ही मालवाहतूक सेवा सुरु केली असता, तिच्या मार्फतीने मालवाहतूक करुन त्यापोटी मिळालेले तब्बल ३० लाख रुपयांचे भाडे एसटी महामंडळातील वाहकाने परस्पर लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार, चौकशीअंती सिन्नर येथील गणेश चौकात राहणारा महामंडळाचा वाहक संशयित अशोक रघुनाथ मोरे याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा (Embezzlement) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोना संसर्ग (Corona Virus) व त्यातून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची प्रवासी सेवा बंद करण्यात होती. एसटीची चाके लॉकडाऊनमध्ये रुतल्याने आर्थिक भार भरुन काढण्यासाठी महामंडळाने महाकार्गो ही मालवाहतूक सेवा सुरु केली. हजारो लालपरी बसेस या मालवाहू ट्रकमध्ये रुपांतरीत करुन ही सेवा सुरु झाली होती. दरम्यान, ही सेवा अविरत सुरु असताना, महामंडळाच्या नाशिक डेपोतील (Nashik Depo) संशयित वाहक मोरे यांना महाकार्गोसाठी नियुक्त करण्यात आले होते.
तेव्हा त्यांनी एक एप्रिल २०२३ ते २६ मार्च २०२५ या कालावधीत मालवाहू बसेसमधून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी लाखो रुपयांच्या अत्यावश्यक साहित्यासह मालवाहतूक केली. असे असतानाच, मोरे यांनी, ज्या कंपनीच्या मालाची वाहतूक केली त्या मालवाहतुकीच्या (Freight) भाड्याची रक्कम एसटी. महामंडळाच्या नाशिक आगाराच्या कार्यालयात जमा करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी मालवाहतुकीपोटी मिळालेल्या भाड्याची सुमारे ३० लाख ६७हजार ३५० रुपयांची रक्कम एन. डी. पटेल रोडवरील आगारात जमा न करता या रकमेचा अपहार केला. त्यामुळे एसटी महामंडळाचे दादाजी कैलास महाजन यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद झाला असून तपास सहायक निरीक्षक वसंत पवार करत आहेत.
काही सेवकांची चौकशी, भरणा करण्यासाठी मुदत
महाकार्गो सेवेत चालक म्हणून राज्यात शेकडो चालक व वाहक कार्यरत होते. त्यानुसार, अनेक ठिकाणी चालक व वाहकाने संगनमताने महामंडळाला आर्थिक गंडा घातल्याचे समोर येते आहे. अनेक प्रकरणांत संशयित वाहक आणि चालकांची चौकशी सुरु असून अनेकांना महामंडळाच्या मालकीची भाडेरक्कम भरण्यास नोटिसा काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घोटाळ्यात किती संशयित सहभागी आहेत, व्याप्ती किती आहे, याची चौकशी केली जात आहे.