नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मखमलाबाद रोडवरील शांतीनगर भागात राहणाऱ्या टोळक्याने १७ वर्षीय मुलावर मागील भांडणाची कुरापत काढून घातक हत्याराने वार केले. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. २) रात्री नऊ वाजता मखमलाबाद रोडवरील घाडगे मळ्यानजिकच्या युगंधरा पेट्रोल पंपावर घडली. या हल्ल्यात कृष्णा सुरेश धात्रक हा अल्पवयीन मुलगा जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) चौघांवर गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले आहे.
अनिकेत भरत तिडके (वय २०, रा. मखमलाबाद गाव), भोल्या रायकर (वय २१, रा. शांतीनगर), अभिजित वाघ (२१) व गणेश सोनवणे (वय २१, दोघे रा. मखमलाबाद गाव) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. धात्रक हा मखमलाबाद शिवारात कपड्याचे दुकान चालवितो. त्याची काही महिन्यांपूर्वी वरील संशयितांशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याच्यात व संशयितांत (Suspected) काहीतरी कारणातून वाद झाले होते.
यानंतर, संशयितांनी त्याच्यावर याआधीही हल्ल्यांचा प्रयत्न केल्याचे आता समोर आले आहे. दरम्यान, रुपेश सुनील काळे (वय १८ रा. स्वामी विवेकांनंद नगर, मखमलाबाद रोड) याने संशयितांविरोधात फिर्याद नोंदविली आहे. त्यान्वये, रात्री पावणे नऊ सुमारास कृष्णा घरी जात होता. तेव्हा युंगधरा पेट्रोल पंपामध्ये असताना, वरील संशयित आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या राग काढून पळत येऊन त्याला व कृष्णाला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) सुरु केली.
तेव्हा भोला रायकर याने धारदार हत्याराने कृष्णाच्या उजव्या डोळ्याजवळ वार करुन दुखापत केली. दरम्यान, अचानक झालेल्या हल्ल्यातून सुटका करण्यासाठी कृष्णा तेथून पळू लागला. तेव्हा अनिकेत तिडके व गणेश सोनवणे यांनी रस्त्यालगत पडलेले दगड कृष्णाच्या गुडघ्यावर मारुन जखम केली. याबाबत मालेगाव स्टॅन्ड पोलीस चौकीचे हवालदार डी. बी. शेळके तपास करत आहेत.
संशयितांकडून परिसरात हप्ते वसुली
गेल्या दोन वर्षांपासून वरील टोळक्याने शांतीनगर, स्वामी विवेकानंद नगर, मखमलाबाद भागातील उपभागांत प्रचंड दहशत माजविली आहे किरकोळ विक्रेतेव हॉकर्सकडून हे संशयित पन्नास ते १०० रुपयांपासून पुढील रकमेचा हप्ता उकळत आहेत, असा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे या टोळक्याची दहशत मोडून काढण्यासाठी पंचवटी पोलिसांनी त्यांना कठोर शासन करण्यासह परिसरातून धिंड काढण्याची मागणी रहिवाश्यांनी केली आहे.
मुद्दे
- संशयितांकडून पादचाऱ्यांसह अनेकांना नाहक त्रास
- दुकानदारांकडून हप्ते क्सुलीचा आरोप
- दहशतीमुळे तक्रार करण्यास नागरिक धजावले नाही
- पोलिसांनी टवाळांचे अड्डे, चौक लक्ष करण्याची मागणी
- संशयितांपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
- वसुलीसह दहशतीच्या वादातून हल्ला