नाशिक | प्रतिनिधी | Nashik
परिचय असल्याचा फायदा घेत संशयित कुटुंबाने (Family) एका व्यक्तिकडून उपचाराच्या नावे सात लाख रुपये उकळले असता, ते परत मागितल्यानंतर संशयितांनी (Suspected) या व्यक्तिच्या नातलगास रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पुन्हा सात लाख रुपये घेत तब्बल चौदा लाख रुपये घेऊन गंडा घातला आहे. त्यानुसार, संशयित राहुल सुधीर गांगुर्डे, सुधीर गेणूजी गांगुर्डे व निलम राहुल गांगुर्डे या संशयितांवर गंगापूर पोलिसांत (Gangapur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील शंकर कदम (वय ४०, रा. सिरीन मेडॉज, गंगापूर रोड, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, १ सप्टेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ पर्यंत सम्राट ट्रॉपिकानो येथे असताना वरील संशयितांनी ओळख असल्याचा फायदा घेऊन त्यांच्याकडून औषधोपचारार्थ सात लाख रुपये घेतले.
दरम्यान, कालांतराने हे पैसे कदम यांनी परत मागितले असता संशयितांनी पैसे परत न करता, कदम यांना त्यांचा शालक निशांत तायडे यांना रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यासाठी पुन्हा सात लाख रुपये घेतले. मात्र, मागील सात लाख रुपये व नोकरीदेखील मिळाली नसल्याने त्यांनी पोलीस ठाणे (Police Station) गाठून तक्रार नोंदविली आहे.