नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपुरच्या कामगार नगरमधील एका युवकाचा (Youth) टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खुन (Murder) केल्याची घटना शनिवारी (दि. ८) रात्री अकरा वाजेच्या सुमारास कॉलेजरोडवरील संत कबीर नगरमधील मुख्य रस्त्यावर घडली. अरुण राम बंडी (२९, रा.कामगार नगर, सातपूर ) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी (Police) सांगितले.
अरुण हा संत कबीर नगर परिसरात रात्री आला असता त्याचे जुने वाद असलेल्या सातपुरच्या एका टोळक्याने त्याला या ठिकाणी घेरले. धारदार शस्राने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. अरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मुख्य रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. तसेच हल्लेखोरांच्या दोन दुचाकी रस्त्यावर तोडफोड करून पाडण्यात आल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने दंगल नियंत्रण पथकाचे काही जवानांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
दरम्यान, गंगापूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेत तिघा हल्लेखोर संशयिताना ताब्यात घेतले. यामधील दोघे जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गंगापूर पोलीस ठाण्याचे (Gangapur Police Station) पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर या अधिकाऱ्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान मृतदेह घटनास्थळावरून शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर परिसरात गर्दी जमली होती. यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्याचा बंदोबस्त शासकीय रुग्णालयात (Hospital) तैनात करण्यात आला होता.