शिरवाडे वाकद | प्रतिनिधी | Shirwade wakad
पीडित युवतीच्या घरासमोरुन ये-जा करत प्रेम कर, लग्न कर असे म्हणत त्रास देऊन पिडितेने नकार दिल्यावर घरात जाऊन पिडितेच्या वडिलांसमोर खुन केला व पिडितेच्या वडीलांचाही खुन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात सुरज दिगंबर चव्हाण रा.मौजे सुकेणे यास दोषी ठरविण्यात आले आहे. त्यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.बी.डी.पवार यांनी जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावली आहे
कसबे सुकेणे (Kasbe Sukene) येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, सुरज दिगंबर चव्हाण हा मौजे सुकेणे येथील युवक हा कसबे सुकेणे राजवाडा भागात राहणारे चंद्रकांत ढेंगळे यांचे घरासमोरुन ये-जा करत मुलीस, ‘तु माझेशी बोल, माझेवर प्रेम कर’ असे म्हणून त्रास देत होता. त्याबाबत ओझर पोलीस स्टेशनला (Ozar Police Station) तक्रार देण्यात आली होती. सुरज चव्हाण यांस दि.२४ जुलै २०१८ रोजी पोलिसांकडून समज देण्यात आली होती. मात्र दि.३१ जुलै २०१८ रोजी सुरज चव्हाण पीडित मुलगी वडीलांसह घरात असतांना सकाळी ११ वा.चे.सुमारास तो घराकडे येत असतांना मुलीने तात्काळ घरात बैठक रुममध्ये असलेले वडील चंद्रकांत ढेंगळे यांना सांगितले.
त्याचवेळी सुरज चव्हाण हा दोन्ही हात पाठीमागे ठेऊन आला. त्याचवेळी वडील चंद्रकांत ढेंगळे यांनी सुरज चव्हाण यांस, ‘मुलीला का त्रास देतो?’ असे विचारले. मात्र, सुरजने त्यास काहीही प्रतित्युत्तर न देता मुलीस, ‘तुला शेवटचे विचारतो, तुला माझेशी बोलायचे आहे की नाही? तु माझेशी लग्न करणार आहे की नाही?’ असे म्हणाला. त्यावर तरुणीने त्यास, ‘तुझ्याशी बोलणारही नाही व लग्नही करणार नाही’ असे उत्तर दिले. त्याचवेळी सुरज याने, मुलीचे केस पकडुन हातात पाठीमागे लपवुन ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने मुलीचे मानेवर व पाठीवर सपासप वार केले. त्यावेळी मुलीस सोडविण्यासाठी धावलेले वडील चंद्रकांत ढेंगळे यांचेवरही त्याच कोयत्याने वार करुन जखमी केले. त्याच्या वाराने मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली.
यानंतर चंद्रकांत ढेंगळे यांनी घराबाहेर येऊन मदतीसाठी टाहो फोडला. तेव्हा अंगणवाडी सेविका असलेली पत्नी मिनाक्षी तसेच आशा कर्डक या धावत आल्या. त्यांनीही सुरज चव्हाण यांस घटनास्थळावरुन रक्ताच्या कपड्यांसह जातांना पहिले होते. घरात रक्ताच्या थारोळ्यात पीडित मुलगी मृत झाली होती. चंद्रकांत ढेंगळे यांना वैद्यकिय उपचारासाठी प्रथम कसबे सुकेणे व नंतर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान चंद्रकांत ढेंगळे यांनी दिलेल्या जबाबावरुन, सुरज चव्हाण याच्याविरुध्द ओझर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, ३२६, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सुरज चव्हाण यांस अटक करण्यात येऊन त्याने या गुन्ह्यात वापरलेले हत्यार कोयता लपवुन ठेवला होता.
तर ओझर पोलिसांनी बारकाईने तपास करुन, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. गुन्ह्यात वापरलेले हत्याराचा शोध घेऊन ते सुरज चव्हाण याचे निवेदन पंचनाम्यानुसार जप्त केले. मयत मुलगी, जखमी चंद्रकांत ढेंगळे तसेच सुरज चव्हाण याचे अंगावरील कपडे आणि जप्त केलेला कोयता हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल प्राप्त केला.आरोपपत्र निफाड न्यायालयात सादर करण्यात आले. या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल ॲड.रामनाथ शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी चंद्रकांत ढेंगळे, प्रत्यक्षदर्शी, उपचार करणारे व उत्तरीय तपासणी करणारे वैद्यकिय अधिकारी तसेच तपास अधिकारी पो.नि.राजकुमार उपासे, स.पो.नि. नितीन पाटील, पो.उपनिरीक्षक प्रकाश बोराडे आदी एकुण १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली व प्रभावी युक्तिवाद केला.
दरम्यान, या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पो.संजय आहेर, पो. दिपक गुंजाळ यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी सुरज चव्हाण यांस भादंवि.कलम ३०२ अन्वये जन्मठेप व ३ हजार रु दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावास, भादंवि कलम ३०७ अन्वये ७ वर्ष सक्तमजुरी, २ हजार रु.दंड, दंड न भरल्यास चार महिने कारावास, भादंवि कलम ४५२ अन्वये पाच वर्ष सक्तमजुरी, १ हजार रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास, भादंवि कलम ५०६ अन्वये, दोन वर्ष सक्तमजुरी, १ हजार रु.दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास, भादंवि कलम ५०४ अन्वये एक वर्ष कारावास, १ हजार रु.दंड, दंड न भरल्यास दोन महिने कारावास अशी शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.बी.डी.पवार यांनी ठोठावली आहे.