नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अल्पवयीन पीडितेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली असता, तिच्या पालकांना धमकावणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रफुल्ल सोमनाथ गंगावणे (२१, रा. राजीव गांधीनगर, गोवर्धन, गंगापूर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पालकांच्या फिर्यादीनुसार, आरोपीने मार्च २०२२ ते मार्च २०२३ या दरम्यान पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरी, श्रीरामवाडी, नाशिक, महिरावणी अशा ठिकाणी हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. यात पीडिता गर्भवती राहिली असता आरोपीने तिच्या पालकांना, पोलिसात (Police) तक्रार केली तर राहू देणार नाही, अशी धमकीही दिली होती. सरकारवाडा पोलिसात पोस्कोसह बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल होता.
दरम्यान, गुन्ह्याचा (Case) तपास तत्कालीन सहायक निरीक्षक गौतम सुरवाडे यांनी केला असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी कामकाज पाहिले. यात आरोपीविरोधात दोष सिद्ध झाल्याने न्या. पांढरे यांनी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार माणिक पवार, गणेश भोसले, महिला अंमलदार रंजना गायकवाड यांनी पाठपुरावा केला.