नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’, बेकायदेशीर धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिला फरार कालावधीत आश्रय दिल्याचा आरोप असलेले छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) अखेर आज (२५ मे) नाशिक पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले आहेत. सध्या नाशिक पोलीस आयुक्तालयात विशेष तपास पथकाकडून (SIT) त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, टिसीएस प्रकरणात (TCS Case) गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य संशयित आरोपी निदा खान ही नाशिकमधून फरार झाली होती. या फरार कालावधीत एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरात बेकायदेशीररीत्या आश्रय दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन शोधमोहीम राबवली होती, मात्र त्यावेळी मतीन पटेल पोलिसांच्या हाती लागले नव्हते.
पोलिसांच्या दबावानंतर नरमाईची भूमिका
दरम्यान, पोलिसांनी नाशिक रोड न्यायालयात (Nashik Road Court) या प्रकरणाचे दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते. त्यानंतर गुन्हे शाखेकडून मतीन पटेल यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पुढे सरकत असल्याने आणि कारवाईचा दबाव वाढल्यानंतर मतीन पटेल यांनी अखेर नरमाईची भूमिका घेत आज (सोमवारी) आपल्या वकिलांसह नाशिक पोलिसांसमोर हजेरी लावली. सध्या एसआयटीकडून मतीन पटेल यांची सविस्तर चौकशी सुरू असून, निदा खानला संभाजीनगरमधील कोणत्या घरात आणि कोणाच्या सांगण्यावरून आश्रय देण्यात आला, याबाबत तपास सुरू असल्याचे समजते. तसेच याप्रकरणी संबंधित घरमालकाचा जबाबही नोंदवला जाणार असल्याची माहिती आहे.
अटकेची टांगती तलवार, सर्वांचे लक्ष पुढील कारवाईकडे
मतीन पटेल यांच्या चौकशीनंतर पोलीस त्यांना अटक करणार की त्यांची जामीनावर मुक्तता होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही. मात्र, या मोठ्या घडामोडीमुळे ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील अनेक गुप्त माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता एसआयटीच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.




