नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
‘आम्ही या परिसरातील डॉन आहोत, कोणीमध्ये पडले तर त्याला आम्ही संपवून टाकू’ असे म्हणत मद्यधुंद अवस्थेत व्यवसायिकाला मारहाण करणाऱ्या संशयितांना (Suspects) धडा शिकवण्यासाठी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्यासाठी अंबड पोलिसांनी (Ambad Police) संशयितांची चांगलीच जिरवली. ज्या ठिकाणी दहशत माजवली त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही, असा संदेश दिला.
सोमवार (दि.१० रोजी) छत्रपती शिवाजी चौकात (Chhatrapati Shivaji Chowk) रात्रीच्या सुमारास संशयित स्वप्निल सुभाष कावले, गुड्डू उर्फ प्रेम एकनाथ सावंत, राहुल विठ्ठल पांलटे, सनी राजु आठवले, सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत व सुफियान सलीम शेख, रा लेखानगर यांनी व्यवसायिकाला स्टील रोड ने मारहाण केली होती.
तसेच रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान करत दहशत माजवली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरुद्ध (Accused) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी चक्र फिरवत अर्ध्या तासाच्या आत पाचही संशयितांना ताब्यात घेतले होते.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये गुन्हेगारांबद्दलची भीती कमी व्हावी या उद्देशाने पोलिसांनी (Police) छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात संशयितांची धिंड काढली. संशयित आरोपींबरोबर पोलिसांचा फौज फाटा असल्याने नागरिकांनी गुन्हेगारांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. संशयितांची धिंड काढल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.




