चांदवड | प्रतिनिधी | Chandwad
वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात तालुक्यातील शेलूच्या महिला तलाठ्यासह (Woman Talathi) एका खासगी दलालास ४ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने (Anti-corruption Department) सापळा रचत दोघांना रंगेहाथ अटक केली.
आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त तलाठी विशाखा गोसावी लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने ‘आदर्श’ पुरस्कारावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकातर्फे ज्ञानेश्वर एकनाथ बरकले (३४, परसूल) व तलाठी विशाखा भास्कर गोसावी (३७, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात चांदवड पोलिसात (Chandwad Police) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील (Taluka) ३३ वर्षीय तक्रारदार यांची वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या तळवाडे येथील शेत जमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात एजंट ज्ञानेश्वर एकनाथ बरकले व शेलू सजाच्या तलाठी विशाखा गोसावी यांनी ८ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात तडजोडीनंतर ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत अटक (Arrested) केली. एजंट बरकले यांच्याकडे एक मोबाईल सापडला असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
महिनाभरात तिघे अटकेत
तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये लाचेच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील महिन्याच्या १३ फेब्रुवारी रोजी रायपुरचे मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. या घटनेला विसरत नाही तोच पुन्हा तलाठी अन एक खासगी दलाल यांना ४ हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्याने महसूल विभागाचा कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे.
लाचखोरीत एजंटचा वापर
खासगी एजंट बरकलेला प्रथम आरोपी करत मुख्य तलाठी महिला गोसावीला सह आरोपी करण्यांत आल्याने सर्वसामान्य आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या प्रकरणांत जबाबदारी ही संबंधित तलाठी गोसावीची असतांना ही मेहरबानी का? असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. चांदवडला यापूर्वी झालेल्या कारवाईत देखील खासगी एजंटलाच आरोपी ठरविण्यात आले होते. लाचखोरीच्या अश्या कारवाईत ‘खासगी एजंट’चा फंडा मात्र निर्णायक ठरत आहे.