नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सन २०१७ पंचवटीतील नवनाथनगरात घडलेल्या किरण राहुल निकम याच्या निघृण हत्या प्रकरणात (Murder Case) चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा मिळाली असतानाच मृत निकमवर सर्वाधिक ३० हून अधिक वार करुन गेल्या आठ वर्षांपासून फरारी असलेल्या खलनायक उर्फ विक्की पंजाबी याला गजाआड करण्यात आले आहे. गुंडाविरोधी पथकाने (Anti Gang Squad) चंदीगड व्हाया हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पोहोचून ही कारवाई केली. आता त्याच्याविरोधात न्यायालयात खटला चालविला जाणार आहे.
पंचवटीतील (Panchvati) मार्केट यार्ड व पेठरोड भागात निकम व उघडे गैंगमध्ये वर्चस्ववादातून अधूनमधून खटके उडत होते. त्यातून १८ मे २०१७ रोजी नवनाधनगरमध्ये राहणाऱ्या निकम गँगमधील किरण निकम याच्यावर उघडे गँगमधील संतोष उघडे, संतोष पगारे यांनी कुरापत काढून गणेश उघडे, जितेश उर्फ बंडू मुर्तडक व त्यांच्या साथीदारांनी किरणवर धारदार शस्त्राने वार करुन ठार मारले होते. याबाबत गणेश उघडे, जितेश उर्फ बंडु मुर्तडक, संतोष पगारे, सागर जाधव, संतोष उघडे, जयेश उर्फ जया दिवे, श्याम पवार, विकास उर्फ विक्की पंजाबी, अनुपमकुमार उर्फ छोटु कनोजिया यांच्याविरुद्ध गुन्हा (Case) दाखल आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी (Police) दोषारोपपत्र दाखल केले असता अंतिम सुनावणाअंती न्यायालयाने गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडु संपत मुर्तडक या चार आरोपींना दोषी धरुन ९ में २०२३ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र गुन्ह्यात विकास उर्फ विक्की पंजाबी पसारच होता. इतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळाली, परंतु मुख्य आरोपी अजूनही फरार असल्याने त्याला अटक करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते.
त्यानुसार, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना आदेश दिले. त्यानुसार, पथकाने विक्की पंजाबीच्या पूर्वाश्रमीच्या मित्रांची माहिती मिळविली, तेव्हा एक मित्र काही महिन्यांपूर्वीच चंदीगड येथे त्याला भेटून आल्याची माहिती कळाली. त्यानुसार पोलिसांनी चंदीगड गाठले. तेव्हा तो तेथे हॉटेल व्यवसाय करीत असल्याचे समजले.
मात्र त्याचे नाव खलनायक असून तो सध्या हिमाचल प्रदेशातील कुल्लु येथील पुलगा गावालगत हॉर्टलमध्ये मॅनेजर असल्याची माहिती कळाली. त्यानंतर मणिकर्ण पोलिसांच्या हद्दीत पुलगा या पहाडी वस्तीत २३ ऑगस्ट रोजी सर्च ऑपरेशन राबवून पहाटे चार वाजता विकास विजय खलनायक उर्फ विक्की पंजाबी (वय २९, रा. सेक्टर २६, बापूधाम कॉलनी, चंदीगड) याला ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेशातून चार दिवसांची ट्रान्झिट रिमांड घेऊन शहर पोलीस सोमवारी सकाळी नाशिकमध्ये पोहोचले.
गौरी किन्नरशी विवाह
खलनायकचे कुटुंब मूळचे पंजाब राज्यातील असून, गेल्या बारा वर्षांपासून पंचवटीत वास्तव्यास होते. पेटिंगचे काम करुन उदरनिर्वाह करत होते, त्यांचा मुलगा विक्की हा निकमच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी असून वरील चार आरोपींना शिक्षा ठोठावताना न्यायालयाने पोलिसांना गुन्ह्यातील मुद्देमाल शाबूत ठेवून विक्की पंजाबीला अटक झाल्यावर पुन्हा खटल्याचे कामकाज केले जाईल, असे आदेशात म्हटले होते. त्यानुसार विक्कीला जन्मठेपेची शिक्षा मिळू शकते. दरम्यान, निकमवर खोलवर सपासप वार करण्यात त्याची भूमिका होती. हत्येनंतर तो नाशिकमधून मुंबईतील नातलगांमार्फत पंजाबला गेला होता. त्याने गौरी या किन्नरशी विवाह केला असून तिचाच मोबाईल वापरत होता. म्हणून त्याला शोधण्यात अडचण येत होती.
मुद्दे
- २१ जून रोजी पथक पंजाबच्या दिशेने रवाना
- चंदीगढमधून कळाली विक्कीची ओळख ‘खलनायक’
- मणिकर्ण पोलिसांचे नाशिक पोलिसांना असहकार्य
- दोन किलोमीटर पायपीट, घाट, दरड कोसळल्याने तपासात अडचणी
- सध्या पंजाबीचा ताबा पंचवटी पोलिसांकडे
- चौकशीदरम्यान पंजाबीने पोलिसांचे आधारकार्ड विचारले




