नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुणे रोडवरील (Pune Road) बोधलेनगरात १९ मार्च रोजी उमेश व प्रशांत जाधव या सख्ख्या भावांचा खून (Murder) करणाऱ्या सहा संशयितांनी हत्येत वापरलेली धारदार हत्यारे एका रिक्षाचालक मित्राकडे देऊन त्यांची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याचे एसआयटीच्या (SIT) तपासात समोर येते आहे. त्यानुसार, या दुहेरी खूनप्रकरणात आतापर्यंत आठ जणांना सहभाग उघड झाला असून त्यापैकी प्रत्यक्ष सहा जणांनी मिळून जाधव बंधूंची हत्या केल्याचे निष्पन्न होत आहे.
निलेश शांताराम महाजन असे आठव्या संशयिताचे (Suspected) नाव असून तो रिक्षाचालक आहे. त्याला एसआयटीने अटक केल्यावर न्यायालयाने त्याला ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जाधव बंधू खूनप्रकरणानंतर त्यांचे नातेवाईक, संस्था व नागरिकांनी या गुन्ह्याच्या तपासावर आक्षेप घेऊन मोर्चा काढला होता. तत्पूर्वी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करुन हा गुन्हा गुन्हेशाखचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे तपासासाठी वर्ग केला होता.
एसआयटीचे प्रमुख संदीप मिटके यांनी या गुन्ह्यात अटकेत (Arrested) असलेल्या सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकरवाडी), अनिल विष्णू रेडेकर (४०, रा. उत्तरानगर), सचिन विष्णू रेडेकर (४४, रा. गायत्रीनगर), योगेश चंद्रकांत रोकडे (३०, रा. आंबेडकरवाडी), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे (२६, रा. नवीन सिडको) या पाच मुख्य संशयितांकडे सखोल तपास करुन दुहेरी हत्येच्या कटात सहभागी इतर दोन संशयित योगेश मधुकर गरड व मंगेश चंद्रकांत रोकडे यांना अटक केली.
दरम्यान, आता योगेश व मंगेशसह इतर पाच मुख्य संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार आठवा संशयित रिक्षाचालक निलेशचा हत्याकांडात अप्रत्यक्षरित्या सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक झाली आहे. त्यामुळे सध्यातरी आठ जणांचा हत्याकांडात सहभाग समोर येत असून संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तिसऱ्यांदा रिमांड
संदीप मिटके यांनी न्यायालयासमोर गुन्ह्यासंबंधी वेळोवेळी अनेक बाबी मांडून मुद्देसूद युक्तिवाद केला आहे. यात हत्यारे खरेदी, विल्हेवाट यासह हत्येत वापरलेली चार ते पाचहून अधिक धारदार व टणक शस्त्राने हस्तगत करणे बाकी असून हत्या का व कशासाठी करण्यात आल्या, याचा तपास होणे बाकी असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे बहुतांश मुद्दे ग्राह्य धरून वरील सात संशयितांना न्यायालयाने तिसऱ्यांदा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. त्यामुळे संशयितांचा मुक्काम नाशिकरोड कारागृह ते गुन्हेशाखा कार्यालयाव्यतिरिक्त पुढे सरकत नसून त्यांना जामीनही मिळणे मुश्किल झाले आहे. एसआयटीने हा तपास सुरु करताच पडद्यामागून हालचाली करणाऱ्या मुख्य सूत्रधारांव्यतिरिक्त तिघांचा छडा लावला आहे.
बापरे… सहा सख्खे भाऊ
उमेश व प्रशांत या भावंडांची हत्या करण्यात हिस्ट्रिशीटर, रिक्षाचालक व अवैध धंदे चालविणाऱ्यांचा समावेश असला तरी तीन कुटुंबातील सहा सख्ख्या भावांना हत्याकांडात अटक झाली आहे. त्यात रेडेकर, रोकडे व गरड कुटुंबातील भावांचा समावेश आहे. तर आता रिक्षाचालक महाजन याने कोणती हत्यारे कुठे फेकली किंवा विल्हेवाट लावली, याचा तपास केला जात आहेत.