नाशिक | प्रतिनिघी | Nashik
टीसीएस कंपनीतील (TCS Company) अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणातील संशयित व छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक रोड न्यायालयाने (Nashik Road Court) ७५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, या खटल्यातील मुख्य संशयित दानिश शेख याच्या जामीन अर्जावर न्यायालयाने कारवाई पुढे ढकलली असून त्यावर आता २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
सोमवारी (दि. १७) पार पडलेल्या सुनावणीदरम्यान (Hearing) संशयित तौसिफ अत्तार आणि निदा एजाज खान हे दोघे न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. तर मुख्य संशयित दानिश शेख आणि मतीन पटेल यांना मध्यवर्ती कारागृहातून व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) द्वारे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दानिशच्या जामीन अर्जाला विरोध करत मूळ पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात जबाब नोंदवला.
यावेळी मतीन पटेलच्या (Matin Patel) वकिलांनी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांचे ‘वकीलपत्र’ अधिकृतपणे दाखल करून घेण्यासाठी पुढील तारीख निश्चित करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक गुन्ह्याचा तपास करत आहे.
मतीन पटेलचा सहभाग काय?
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, मुख्य संशयित निदा खान ही पसार असताना मतीन पटेल याने तिला हानिफ शेख याचे घर उपलब्ध करून देत आश्रय दिला होता. यामुळे पोलिसांनी मतीनला सहसंशयित केले होते. यापूर्वी खटल्याच्या सुनावणीस गैरहजर राहिल्याने मतीनविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले होते. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अखेर त्याला ७५ हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
मुद्दे
- मुख्य संशयित दानिश शेखनर बलात्काराचा गंभीर आरोप असून सध्या ताे कारागृहात आहे.
- तौसिफ अत्तारवर विनयभंगाचा आरोप असून ताे सध्या जामिनावर बाहेर आहे.
- निदा एजाज खान हिच्यावर धर्मांतराचा प्रयत्न आणि कट कारस्थानाचा गुन्हा असून ६ जुलै रोजी जामीन मंजूर आहे
- मतीन पटेल व हानिफ शेख यांनी निदाला आश्रय देणे व सहकार्य केल्याचा आराेप
- मुख्य संशयित दानिश याच्या जामीन अर्जावर २२ ऑगस्ट रोजी निर्णय




