नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील एका मनाेविकार तज्ज्ञाच्या नावाचे बनावट प्रिस्क्रिप्शन (औषधांची चिठ्ठी) तयार करुन त्यावर सहजासहजी वितरित न केली जाणारी घातक व नशा आणणारी औषधी खरेदी करण्यात आली आहे. मात्र, मेडिकल चालकाच्या सजगतेमुळे हा प्रयत्न फसला असून आता भद्रकाली पाेलिसांनी (Bhadrakali Police) दाखल फिर्यादीनुसार संशयिताचा शाेध सुरु केला आहे. हा संशयित, रुग्ण किंवा हाल्फ एज्युकेटेड नशेखाेर असण्याची शक्यता आहे.
गंगापूर राेडवरील (Gangapur Road) सिरिन मेडाेज परिसरात डाॅ. मुक्तेश काकासाहेब दाैंड (वय ३९) हे वास्तव्यास आहेत. ते एमबीबीएस व मनाेविकार तज्ज्ञ असून नाशिकमधील खासगी रुग्णालयात व वैयक्तिकरित्या प्रॅक्टिस करतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, २७ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत अज्ञात संशयिताने (Suspect) सायंकाळी साडेपाच वाजता डाॅ. दाैंड यांचे व रुग्णालयाच्या नावाचे खोटे प्रिस्क्रिप्शन पॅड तयार केले.
त्यावर त्यांची खोटी सही व खोटे शिक्के मारुन त्यावर संबंधित रुग्णांना सहजासहजी न दिली जाणारी औषधे लिहिली. ही औषधी डाॅक्टरांचा सल्ला व प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही. असे असतानाही संशयिताने मनाेविकार व इतर आजारांसंबंधीची ही घातक तसेच नशा, गुंगी आणणारी औषधे काठेगल्लीतील एका नामांकित मेडिकल चेनच्या स्टाेअरकडे ऑनलाइन पाठविली. मात्र, मेडिकल स्टाेरमधील प्रतिनिधीस काहीसा संशय (Dout) आल्याने त्याने थेट डाॅ. मुक्तेश यांना संपर्क केला. तेव्हा मुक्तेश यांनी अशी औषधे प्रिस्क्राईब केलीच नसल्याचे सांगितले. त्यामुळे दाेघांनाही धक्का बसला.
दरम्यान, मुक्तेश यांनी पाठपुरावा करण्यासाठी भद्रकाली पाेलीस ठाणे गाठून गंभीर प्रकराची माहिती वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिली. त्यानुसार, पथकाने गुन्हा नाेंदवून घेत तपास सुरु केला आहे. त्यात आता सीसीटीव्ही फूटेजसह व्हाट्स अॅपवरुन आलेल्या चिठ्ठीचा मूळापासून तपास केला जात आहे. या प्रकरणात घातक औषधी व गाेळ्या जास्त प्रमाणात मिळविण्याच्या हेतूने हा गंभीर प्रकार केल्याचे तपासात समाेर येते आहे. त्यामुळे हा प्रकार कुणी व का केला याचा लवकरच उलगडा हाेणार आहे.
आरएक्स’ म्हणजे काय?
काेणताही डाॅक्टर संबंधित रुग्णाची तपासणी केल्यावर त्याला त्या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणूण लेटरपॅडवरील रुग्णालयाचा रजिस्टर्ड नंबर, डाॅक्टरचे नाव व संपर्कच्या मजकुरानंतर पांढऱ्या चिठ्ठीवर रुग्णाचे नाव, वय, तारीख व त्यानंतर ‘आरएक्स’ अर्थात प्रिस्क्रिप्शन म्हणजेच आवश्यक औषधांची नावे, ती किती व कधी घ्यावी वैगेर असे प्रमाण नमूद करताे. त्यानंतर या चिठ्ठीवर सही करताे. यालाच डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन म्हणतात.
असे झाले उघड
संशयिताने २७ एप्रिल रोजी इंदिरानगर येथील मेडिकलमधून तब्बल २८० गोळ्या खरेदी केल्या. त्यानंतर २९ एप्रिलला पुन्हा २९० गोळ्या घेतल्या. या गोळ्या संशयिताने बनावट प्रिस्क्रीप्शनचा वापर करून खरेदी केल्या. दरम्यान, ५ मे रोजी देखील संशयिताने काठेगल्ली येथील मेडिकलमध्ये व्हाॅट्सअपवर बनावट प्रिस्क्रीप्शन पाठवत गोळ्यांची मागणी केली. मेडिकल कर्मचाऱ्यास संशय आल्याने त्याने डॉ. दौंड यांच्याशी संपर्क साधून प्रिक्शिप्शन पाठवत रुग्णास या गोळ्या तुम्ही लिहून दिल्या का याची विचारणा केली. त्यावेळी हे बनावट प्रिस्क्रिप्शन असल्याचे उघड झाले.
मुद्दे
– प्रिस्क्रिप्शनवर रुग्णाचे नाव तबस्सुम इमरान शेख असे
– मालेगावात कुत्ता गाेळी म्हणजेच अल्प्राझाेलमची छुपी विक्री
– या व अशा स्वरुपाची औषधे तज्ज्ञ डाॅक्टरच देऊ शकतात
– मनाेविकारावरील औषधींचे रेकाॅर्ड मेंटेन केले जाते
– गंभीर आजारावरच गुंगीकारक औषधे दिली जातात
– अनेकांकडून नशेसाठी औषधांचा वापर
– मेडिकलमधून एप्रिल महिन्यात सुमारे ५०० गोळ्यांची खरेदी
– मे महिन्यातही पुन्हा गोळ्या खरेदीचा प्रयत्न, मात्र फसला