नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील (Panchavati) मखमलाबाद नाक्यावरील उदय कॉलनीत राहणाऱ्या भाजप (BJP) कामगार आघाडीचा सरचिटणीस रोहित कैलास कुंडलवाल याने वडिलांच्या मदतीने बेकायदेशिर सावकारी केल्याचे उघड झाले आहे. जुने नाशिक (Old Nashik) येथील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून अतिरिक्त व्याज वसूल करुन पन्नास लाखांची खंडणी मागून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation ) करुन दोघांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रोहित कुंडलवाल (वय ३४, रा. फ्लॅट-४, राधाकृष्ण बंगला, उदय कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. रोहितसह त्याच्या वडिलांविरुध्द भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन रोहितला अटक केली आहे.
जुने नाशिक भागात राहणाऱ्या ४० वर्षीय कापड व्यावसायिक महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित व त्याचे वडील कैलास बाबुलाल कुंडलवाल (वय ५६) यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरु झाली आहे. पीडित महिलेचे भद्रकाली पोलिसांच्या (Bhadrakali Police) हद्दीतील हुंडीवाला लेन येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. तिने व पतीने कपडे व्यवसाय थाटण्यासाठी कुंडलवाल यांच्याकडून व्याजाने पंधरा लाख रुपये घेतले. यानंतर, २०२२ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत कुंडलवाल यांनी महिलेस दिलेल्या १५ लाख रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात अवाजवी दराने तब्बल ३८ लाख रुपये वसूल केले. त्यानंतर मुद्दल व व्याज धरुन पन्नास लाख रुपयांची मागणी केली.
दरम्यान,ही रक्कम न दिल्याने संशयिताने पीडितेस कॉलेजरोडवरील (College Road) बिग तवा हॉटेल येथे बोलावून फोर्ड इंडेव्हर कारमध्ये जबरदस्तीने बसवून प्रसाद सर्कल जवळील जीममध्ये नेले. तेथे तिला लज्जा उत्पन्न होईल, अशा शिव्या देऊन हातवारे केले. यानंतर, पीडितेसह तिच्या पतीस याने पंचवटीतील भक्तीधाम सिग्नलजवळ भेटण्यास बोलावून पिस्तूलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यानंतर, (दि. १२) रोजी दुकानात येऊन रोहितने अवाजवी पैशांची मागणी करून पीडित महिलेच्या (Woman) अल्पवयीन मुलीचा हात पकडून जवळ ओढत अश्लिल कृत्य केले. त्यामुळे ‘पुढचे काय ते आता समजून घ्या’ अशी धमकी दिली. दरम्यान, रोहित व त्याच्या साथीदारांनी ज्या नागरिकांकडे खंडणी मागितली आहे किंवा खासगी सावकारीतून त्रास दिला आहे. त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची सूचना पोलीस आयुक्तालयाने केली आहे.
रोहित युवा मोर्चाचा पदाधिकारी
संशयित रोहित कुंडलवाल (Rohit Kundalwal) हा गेल्या आठ वर्षांपासून आरके फाऊंडेशन नावाने काम करतो. त्याचे मधुबन कॉलनीलगत संपर्क कार्यालय असून त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटसवर त्याने भाजप कामगार आघाडी सरचिटणीस आणि भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी अशा नावाने पोस्ट, बॅनर अपलोड केले आहेत. तसेच त्याचे वडील कैलास हे राष्ट्रीयीकृत बँकेतून सेवानिवृत्त झाले असून फाऊंडेशन व पक्षाच्या माध्यमातून रोहितने समाजोपयोगी कार्य केल्याचे फोटो व रिल्स त्याच्या इन्स्टा व फेसबुक अकाऊंटवर दिसतात.
वैभव देवरेची सावली!
अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरेसह टोळीवर गुरुवारी (दि. १३) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोक्काअन्वये कारवाईस मंजुरी दिली आहे. तरी त्याच्यासारखीच सावकारी फोफावून खंडणी मागणाऱ्या हायप्रोफाईल कुंडलवाल बापबेट्याचे कारनामे समोर आल्याने सखोल तपास सुरु झाला आहे. हा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या सूचनेने निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांचे पथक संशयिताच्या मागावर रवाना झाले. त्याला ताब्यात घेतल्यावर अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी एका बाजूने २६ व दुसऱ्या बाजूने २९ असे एकूण ५५ जणांची यादी असलेला कागद त्याच्या खिशात आढळला. त्यानुसार संशयिताने (Suspected) या पंचावन्न लोकांना खासगी सावकारीतून पैसे दिल्याचा संशय आहे. यासह त्याच्या घरातून एक छोटी डायरी जप्त करण्यात आली.
मुद्दे
- रोहितच्या घरातून नोटा मोजण्याचे मशीन जप्त
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेत रोहितचे फोटो
- ३ मोबाइल, सोन्याचा गोफ, पंधरा हजार रुपये रक्कम जप्त
- एमएच २० एफयू ६८०० क्रमांकाची फोर्ड कार जप्त
- घरातून एक पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे हस्तगत
- रोहित व कुटुंबाचे हायप्रोफाईल राहणीमान
- आईला मनपा निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी खटाटोप
- समाजकारणाच्या चादरी आडून सावकारीचा धंदा
- जीम, महागडे गॅझेट्स, दागिने, आयफोनचा शौक