पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
पंचवटीतील (Panchvati) म्हसरूळ परिसरातील (Mhasrul Area) सीतासरोवरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या तोंडातून पेस ( फेस ) आढळल्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना (Police) घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) पाठवला आहे. पोलिस यंत्रणेला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाच्या आसपास ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार दि. ३ रोजी रात्रीच्या सुमारास पाच ते सहा जण सरोवर परिसरात मद्यपान करताना दिसले होते. त्यानंतर काही वेळात मोठा गोंधळ झाला होता. याच दरम्यान काही तरी गंभीर प्रकार घडला असावा, अशी चर्चा आता परिसरात सुरू आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मद्यधुंद अवस्थेत झालेल्या वादातून (Dispute) ही घटना घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिस तपास सुरू
पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल झाली होती का? याचीही चौकशी केली जात आहे. स्थानिक नागरिकांकडूनही माहिती घेतली जात असून, पोलिसांनी याबाबत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.
परिसरात भीतीचे वातावरण
घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सरोवर परिसरात सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनीही या भागात पेट्रोलिंग वाढवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच ही घटना घातपात की अपघात? हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, म्हसरूळ पोलिस ठाणे (Mhasrul Police Station) पुढील तपास करत आहे.