Sunday, June 23, 2024
Homeनाशिकघरफोडी करणारा सराईत जेरबंद

घरफोडी करणारा सराईत जेरबंद

नाशिक । प्रतिनिधी I nashik

- Advertisement -

म्हसरूळ परिसरातील केतकीनगरमध्ये झालेल्या घरफोडीची उकल करण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास यश आले आहे. याप्रकरणी एका चोरट्यास अटक केली असून घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मुदस्सर खान युसूफ खान (वय 21, रा. म्हाडा बिल्डींग, भारतनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ परिसरातील केतकीनगरमधील ज्योती भुषण गोसावी यांच्या घरी 24 मे रोजी रात्री चोरी झाली होती. चोरट्यांनी घरात प्रवेश करून दीड तोळे वजनाची सोन्याची चेन तसेच विवो कंपनीचा मोबाईल असा 47 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

शहरातील घरफोडीच्या घटनांचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एकचे पोलिस नाईक शांताराम महाले यांना म्हरूळच्या घरफोडीतील संशयित भारतनगरमधील अक्सा मशिदीसमोर येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.

याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलिस अंमलदार शांताराम महाले, बाबुराव गवांदे, प्रवीण कोकाटे, महेश साळुंके, रावजी मगर, आसिफ तांबोळी, राम बर्डे यांच्या पथकाने सापळा रचला होता.

तसेच पोलिस भारतनगरमध्ये गस्त घालत असतानाच संशयिताला चाहूल लागल्याने तो पळू लागला. तेव्हा पथकाने शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत घरफोडीतील मोबाईल मिळून आला. चौकशीत मुदस्सरने गुन्ह्याची कबुली देताना साथीदार विजय वाघमारे (रा. भारतनगर) याच्यासह घरफोडी केल्याचे सांगितले. त्यास म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या