नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमधील (Nashik) प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकास भांडूपमधील ब्रोकर महिलेने नयनरम्य उत्तराखंड राज्यातील (Uttarakhand) आकर्षक गेस्ट हाऊस खरेदीचे आमिष दाखवून सुमारे एक कोटी रुपये उकळले आहेत. केंद्र सरकारची (Central Government) भारतीय राजमुद्रा व मोहोर असलेले ‘बनावट इ स्टॅम्प’ दाखवून तिने विश्वास संपादन करीत हे पैसे उकळल्याचे समोर आले असून आता तिचा शोध सुरु करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक उत्तराखंडमधील रुरकी येथे पोहोचला असता त्याला गेस्ट हाऊसची मालकी त्रेहस्थाची असल्याचे कळताच, फसवणूक (Fraud) झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानुसार, इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धीरज भवरलाल काबरा (वय ५२, रा., श्रीजी सीनर्जी, गोविंदनगर) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची ओळख नाशिकमधील एका ब्रोकरच्या (Broker) मार्फतीने ब्रोकर असलेली संशयित अरुणा श्रीकृष्ण मोरे (रा. मोरे चाळ, मधुबन गार्डनसमोर, एसबीएस मार्ग, भांडूप (प) हिच्याशी ऑगस्ट २०१९ मध्ये झाली होती. तिने उत्तराखंड राज्यातील ‘आयआयटी’ साठी प्रसिद्ध असलेल्या रुरकी गावात ‘साबरी रजवी गेस्ट हाऊस ही कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी माझीच असून तसे कागदपत्रे ही प्रापटी काबरा यांना दाखविले.
दरम्यान, ‘काही कारणास्तव मला ही प्रॉपर्टी विकायची आहे’ असे सांगून तिने गेस्ट हाऊसचे साठेखत, नोटरी व उतारा दाखविला. विश्वास पटल्याने काबरा यांनी व्यवहारास काहीसा होकार दिला. यानंतर, तिने ४ कोटी ६५ लाख रुपयांत प्रॉपर्टी विक्री करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा अरुणा हिने भारत सरकारची छापील मोहोर असलेला हुबेहुब बनावट ‘इ-स्टॅम्प’ पेपर तयार करुन विसार (बयाणा रक्कम) पावती बनवली. हा व्यवहार ‘फायनल’ करण्यासाठी ऑगस्ट २०१९ ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ती अनेकदा इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील हॉटेल तपस्वी येथे आली व काबरा यांच्याशी चर्चा केली. व्यवहार ठरताच, तिने काबरा यांच्याकडून सुरुवातीस १५ लाख रुपये घेतले.
यानंतर, वेळोवेळी एकूण ८६ लाख रुपये ताब्यात घेतले. असे एकूण सुमारे १ कोटी १ लाख रुपये घेतल्यावर काबरा हे प्रॉपर्टीचे खरेदीखत व साठेखत ताब्यात घेण्यासाठी तिला संपर्क करु लागले. तेव्हा तिने बनावट (Fake) ‘नोटरी’ चे कागदपत्रे पाठविली. बराच काळ उलटूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याने काबरा यांना संशय आला. त्यांनी यानंतर प्रॉपर्टीची खातरजमा करण्यासाठी उत्तराखंड गाठले. येथे पोहोचताच त्यांना धक्का बसला. कारण, जी प्रॉपर्टी मोरे हिने सांगितली होती, ती पूर्वीच त्रेहस्थाच्या नावे असल्याचे समोर आले. त्यामुळे हे गेस्ट हाऊस अरुणाच्या मालकीचीच नसल्याचे उघड झाले. आर्थिक फसवणूक झाल्याचे समजल्यावर काबरा यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे (Indiranagar Police Station) गाठून फिर्याद नोंदविली. तपास वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे करीत आहेत.
साडेतीन कोटी वाचले, गुन्हा वर्ग नाही
हा संपूर्ण व्यवहार ४ कोटी ६५ लाख रुपयांत ठरला होता. असे असताना काबरा यांनी एक कोटी रुपये दिले. तेव्हा फसवणूक झाल्याचे समजताच ते सावध झाले. त्यामुळे उर्वरित साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक टाळण्यात त्यांना यश आले आहे. दरम्यान, या फसवणूक प्रकरणात एक कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक झाल्याचे आढळले असून अरुणा हिने अशाच प्रकारे किती व्यावसायिकांना गंडा घातला आहे, याचा तपास आर्थिक गुन्हेशाखा करण्याची शक्यता आहे.




