नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बेकायदेशिररित्या व्यावसायिकाच्या घरात शिरुन शिवीगाळ करीत आमचे वीस लाख रुपये परत द्या, असे म्हणत टोळक्याने दहशत माजवली. शहरातील गजबजलेल्या कॉलेजरोडवरील येवलेकर मळ्यात मंगळवारी (दि.४) सायंकाळी पाच वाजता घडली. या घटनेने कुटुंब पुरते धास्तावले होते. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) अनोळखी सहा संशयितांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, ही घटना घडत असताना मुंदडा कुटुंबाने पोलिसांची (Police) मदत मागितली. मात्र, ती मिळण्यास बराच अवधी लागला.
डॉ. संजय चंपालाल मुंदडा (वय ५८, रा. सृजन बंगलो, येवलेकर मळा, वेस्टसाईड मॉलच्यामागे, कॉलेजरोड, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार, (दि. ४) सायंकाळी पावणेसहा वाजता डॉ. मुंदडा हे कुटुंबासह घरात असताना, सहा अनोळखी संशयित वाहनांतून (Vehicles) आले. त्यांनी मुंदडा यांच्या घराचा दरवाजा जोरात ढकलून आरडाओरड करुन अनाधिकाराने प्रवेश केला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घाबरले. तेव्हा एका संशयिताने दमदाटी करुन ‘ब्रिजेश मुंदडा कुठे आहे’, असे म्हणून दमदाटी केली. हाच आरडा ओरड ऐकून घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये जमले.
तेव्हा पुन्हा एका संशयिताने ‘आम्ही तुमच्या बँक खात्यात २० लाख रुपये टाकले आहेत, ते कुठे आहेत, ते परत करा असे म्हणून वाद घातला. तेव्हा मुंदडा यांचा पुतण्या सिध्दार्थ याने संशयितांना ‘तुमच्यापैकी कुणीतरी एक व्यक्ति येथे थांबा व बाकीचे बाहेर जा’, असे म्हटले. यानंतर, संशयितांनी मुंदडा यांचा भाऊ ब्रिजेशला पकडून जबरीने घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. विरोध होत असताना, संशयितांनी ब्रिजेश यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. तेव्हा मुंदडा व कुटुंबाने ब्रिजेश यांची कशीबशी सुटका करण्याचा प्रयत्न सुरु केला असता, संशयितांनी तेव्हा मुंदडा यांच्या पत्नी मनिषा व वहिनी अर्चना यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत ब्रिजेश यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाली असून दरवाज्याजवळील शूज स्टॅण्ड संशयितांनी दाराच्या दिशेने फेकून पळून काढला. याबाबत गुन्हा (Case) नोंद असून तपास हवालदार किशोर पगार करत आहेत.
तक्रारीचा तपास नाही
ब्रिजेश यांच्या सेव्हिंग बँक खात्यात १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अचानक अज्ञात खात्यामधून वीस लाख रुपये जमा झाले आहेत. या किंवा ज्या खात्यातून रक्कम आली आहे त्यांचा व माझा यापूर्वी कधीही काहीही व्यवहार झालेला नाही. त्यांनी बँकेत जाऊन माहिती घेतली असता ती रक्कम वी. के. सोलार सोल्युशन्स या संस्थेच्या खात्यातून अदा झाल्याचे समजले. त्यामुळे या बेकायदेशीर रकमेचा तपास करावा, यासाठी ब्रिजेश यांनी २१ फेब्रुवारीला लेखी तक्रारही आयुक्तालयास दिली होती. तरीही पोलिसांनी गांभीयनि दखल न घेता तपास केला नाही. त्यामुळे अनोळखी संशयितांनी घरात घुसण्याची मजल मारुन मारहाण (Beating) केल्याचा दावा मुंदडा यांनी केला आहे.