नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड एमआयडीसीतील (Ambad MIDC) कंपनीबाहेर लावलेला युनियन बोर्ड काढतो, असे म्हणून युनियनच्या काही राजकीय गुंडांनी कंपनी व्यवस्थापनाकडे अडीच लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार, पाच ते सहा खंडणीबहाद्दरांवर अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधेश्याम रमेश नंदनवार वय ४७, रा. सहकार कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर नाशिक) हे अंबडच्या यूके मेटल इंडस्ट्रीज या ठिकाणी व्यवस्थापक असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कंपनीत काम करत असताना शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी विनापरवानगीने युके मेटल इंडस्ट्रीज या कंपनीच्या गेटवर अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित कामगार संघटना युनियनचा बोर्ड लावला.
त्यानंतर बोर्ड काढावयाचा असेल तर २५० कामगारांच्या मागे प्रत्येकी १ हजार रुपये याप्रमाणे महिन्याला अडीच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. ही रक्कम देण्याची इच्छा नसल्याने नंदनवार यांनी अंबडच्या एमआयडीसी पोलीस (MIDC Police) चौकी येथे संशयित ज्ञानेश्वर गायधनी, मनोज बोराडे, पंकज सोनवणे, किशोर बरु, जीवन दिघोळे यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यान्वये एमआयडीसी पोलिसांनी संशयितांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी संशयितांना अटक (Arrested) केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
राजकारणी, ठेका आणि स्क्रॅपचा धंदा
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत कंपन्यांमधील स्क्रॅपचा ठेका मिळवण्यासाठी राजकीय गुंडांचा वापर करून राजरोसपणे उद्योजकांना धमकवून खंडणी मागण्याचे प्रकार सुरू असल्याने उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे छोटे मोठे उद्योग व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे. यामुळे उद्योजकांना त्रास देणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुंडांविरोधात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.