नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik City Police Commissioner Office) हद्दीत टवाळखोरांचे वाढते प्रकार लक्षात घेऊन शहर पोलिसांनी उपनगर पोलीस स्टेशन (Upnagar Police Station) हद्दीत टवाळखोरविरोधी व्यापक आणि संयुक्त कारवाई राबविली. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गोंधळ घालणे तसेच शांततेचा भंग करणाऱ्या १०२ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.
ही विशेष मोहीम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ पोलीस निरीक्षक संजिव फुलपगारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणारे, आरडाओरड करून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे १०२ टवाळखोर ताब्यात घेऊन कारवाई (Action) करण्यात आली. पुढील गैरप्रकार टाळावेत यासाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे त्यांना योग्य त्या सूचना देऊन समज देण्यात आली. विशेष म्हणजे, संबंधितांची यादीदेखील पोलीस ठाण्यांनी तयार केली. सातत्याने टवाळखोरी करणाऱ्यांसह विविध गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध मोक्का, तडीपारी, एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित होणार आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांची (Nashik Police) पथके टवाळखोरांना हेरत असली, तरी बऱ्याच ठिकाणी छुप्या पद्धतीने गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांच्या व्हॉटसअॅप हेल्पलाइनवर संबंधितांची ठिकाणे कळविण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे. शहरात गुन्हेगारी, टवाळखोरी व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यपान असे प्रकार रोखण्यासाठी शहर पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. चौकाचौकांत, उपनगरी वसाहतींमध्ये, झोपडपट्टी भागात तसेच महाविद्यालय परिसर व मोकळ्या जागांमध्ये दिवसा आणि रात्री विशेष पोलीस कारवाई राबवली जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.




