नाशिक | प्रतिनिधी | Nashik
व्यावसायिकाकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी बडतर्फ होऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातून (मॅट) स्थगिती मिळवून वर्षभरापूर्वी शहर पोलीस दलात (City Police Force) पुन्हा रूजू झालेल्या वादग्रस्त ‘मॅट’ च्या आदेशानुसार शहर पोलीस आयुक्तालयाने केलेल्या विभागीय चौकशीअंती दोषी ठरवले. त्यानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी मयूर अमरसिंग हजारी (बक्कल नं. २७०८) याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
सन २०२३ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी संबंधित प्रकरणात प्राप्त विभागीय चौकशी अहवालानुसार मयूर हजारीला बडतर्फ केले होते. या कारवाईबाबत हजारीने ‘मॅट’ मध्ये आव्हान दिल्यानंतर ‘मॅट’च्या आदेशाने त्याला शासकीय सेवेत रूजू करण्यात आले. मात्र, त्यावेळी ‘मॅट’ने पोलीस आयुक्तालयाला फेरचौकशीसह स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त कार्यालयाने हजारीला शासकीय सेवेतून बडतर्फ का करु नये? यासंदर्भात नोटीस दिली होती. त्यानंतरील चौकशीत ‘हजारीने अर्जदार नितीन शिंदेकडून जबरदस्तीने घेतलेले तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये अर्जदार यांना नोटरीने देत एक प्रकारे स्वतः अपराध केला आहे. त्यामुळे विभागीय चौकशीत ठेवलेला दोषारोप सिद्ध होत आहे.
हजारीने शिंदे यांचा बेअरर चेक वटवून घेत अपहार केल्याने त्याच्यावरील एकूण सात प्रकारचे दोषारोप सिद्ध होत आहे, हे स्पष्ट झाले आहे. विभागीय चौकशीतील या निष्कर्षानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही हजारी याला बडतर्फ (Dismissed) केले आहे. त्यामुळे दोन वर्षांत हजारीविरुद्ध दुसऱ्यांदा या स्वरुपाची कारवाई झाली आहे. १६ मे २०२५ ला सक्षम मुलाखतीकरता हजारीला आज्ञांकित कक्षात बोलवण्यात आले होते. त्यावेळी ‘कसुरी केलेली नाही, माफी असावी’, असे त्याने कथन केले होते. मयूर हजारी २०१४ मध्ये नाशिक पोलीस (Nashik Police) दलात भरती झाला. मयूरची कारकीर्द भरती झाल्यापासून वादग्रस्त ठरली आहे. यापूर्वी त्याच्यावर दोनदा निलंबन कारवाई झाली होती.
प्रकरण काय?
तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमाजवळ तक्रारदार नितीन शिंदे हे २२ नोव्हेंबर २०२२ ला त्यांच्या कारमध्ये थांबलेले होते. कारमध्ये कृषी औषधांचा साठा होता. तेथे मयूर हजारी तीन साथीदारांसह पोहोचला. रस्त्यात तक्रारदारांना अडवून ‘तुमच्यावर गुन्हा दाखल करू’ अशी धमकी देत दमदाटी केली. यासह अप्रमाणिक व अशासकीय हेतूने मयूरने तक्रारदाराकडून तीन लाख रुपये व एका ‘बेअरर चेक’ने ४५ हजार रुपये खासगी बँकेतून घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण तसेच आर्थिक देवाणघेवाण दिसून येत नाही. कारण, नोटरीत ‘जबरदस्तीने घेतलेली रक्कम’ असा उल्लेख आहे.