नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लासलगावसह (Lasalgaon) राज्यात सर्वसामान्य गुंतवणूकदारांना खोटी अमिषे दाखवून करोडो रुपयांचा घोटाळा (Scam) करत फसवणूक (Fraud) करणाऱ्या स्टार इन्स्पायर मालक असलेल्या आरोपी सतीश पोपट काळे सहआरोपी अनिता रामदास पवार याचे जामीन अर्ज आज न्यायालयाने (Court) फेटाळून ७ मार्चला यावर सुनावणीचे (Hearing) आदेश देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, करोडो रुपयांची गुंतवणूक रक्कम न दिल्याने फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असलेले मुख्य आरोपी सतीश पोपट काळे आणि अनिता रामदास पवार या दोघांचे जमीन अर्ज निफाड (Niphad) येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. को-हाळे यांनी आज झालेल्या सुनावणीत फेटाळले आहेत. तर तिसरा न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी बाळु आनंदा जाधव (रा. जांबुटके) ता. चांदवड याच्या जामीन अर्जावर (Bail Application) येत्या ७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या तीन आरोपींविरुद्ध आर.सी.सी. खटला क्रमांक ३/२०२५ यामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. त्याची सुनावणी निफाड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. कोन्हाळे यांच्या न्यायालयासमोर सुरू आहे. या खटल्यात सतीश पोपट काळे यांच्या वतीने ॲड. वाघ, अनिता रामदास पवार हिच्या वतीने ॲड. गौरव पोपळीया यांनी तर तिसरा आरोपी बाळू आनंद जाधव यांच्या वतीने ॲड. सुनील उगलमुगले तर गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. तुकाराम जाधव यांनी न्यायालयीन कामकाज बघितले.
या जामीन अर्जावर जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ॲड. रामनाथ शिंदे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवाद करून सतीश काळे यांच्या विरोधात एम.पी.डी ॲक्ट प्रमाणे राज्यात १९ गुन्हे दाखल आहेत. त्यात ते न्यायालयीन कोठडीत व जामीनावर असतानाही दहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद असली तरीही सुमारे १२१ कोटी रुपयापर्यंत फसवणूक झाल्याचा तसेच संघटित गुन्हेगारीचा कट रचून फसवणूक करण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हा केल्याचा भारतीय न्यायसंहिता कलम १११ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे फसवणुकीचे भयंकर प्रकरण पाहता जामीन नामंजूर करावा, असा युक्तीवाद ॲड. रामनाथ शिंदे यांनी करत गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे न दिल्याने तर काही गुंतवणूकदारांना पैसे न मिळाल्याने आत्महत्या केल्याबाबतही याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.
स्टार इन्स्पायर या कंपनीचे भारताबरोबरच श्रीलंका व दुबई येथे शाखा आहेत. गुन्ह्याची व्याप्ती पाहता पूर्वी अशाच प्रकारचा गुन्हा सतीश काळे यांनी केलेला होता व त्यात ते जामीनावर बाहेर असताना देखील नियोजनबद्ध पद्धतीने कायद्याची पळवाट शोधत अभ्यास करून त्यातील पळवाटा शोधून सतीश काळे यांनी ही दुसरी मोठी फसवणूक लासलगाव येथे केल्याचे म्हटले असून सतीश काळे यांचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तिवाद केला होता. तो न्यायालयाने ग्राह्य धरला आणि सतीश काळे यांचा जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, या खटल्यातील कंपनीचा आर्थिक व्यवहार हाताळणारी अनिता रामदास पवार ही देखील मागील अशाच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये व्यवस्थापक म्हणून असल्याने व या गुन्ह्यामध्ये पैसे गुंतवणूक होण्यासाठी अनेकांना प्रस्तावित केल्याने प्रत्यक्ष सहभाग असल्याने तिचा जामीन मंजूर करू नये, यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने तीव्र हरकत घेतल्याने न्यायालयाने दोन्हीही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. न्यायालय गुंतवणूकदारांना न्याय देत त्यांच्या गुंतवणुकीचे पैसे परत देण्यासाठी कठोर निर्णय घेऊन सर्वसामान्यांना न्याय देणार का? हे पुढील सुनावणीदरम्यान समजणार आहे.