नाशिक | प्रतिनिधी | Nashik
समाजासाठी कायदे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी धोरणे आखणाऱ्या एका जबाबदार महिला लोकप्रतिनिधीलाच घरात ‘मरणयातना’ सोसाव्या लागल्याचे वास्तव समोर आले आहे. तीन कोटींची खंडणी, गर्भपात आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या डॉक्टर पतीला न्यायालयाने आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) धाडले आहे. सुशिक्षित आणि प्रतिष्ठित वाटणाऱ्या नात्यांमागचा हा क्रूर चेहरा तपासात उघड झाला आहे.
संबंधित महिला लोकप्रतिनिधीने राज्य स्तरावरील महत्त्वाच्या समित्यांवर काम केलेले आहे. मात्र, इतरांना न्याय देणाऱ्या या लोकप्रतिनिधीला स्वतःच्या हक्कासाठी थेट पोलीस ठाणे गाठावे लागले व फिर्याद (FIR) नोंदवावी लागली. त्यानुसार प्रकरणात केवळ घरगुती हिंसाचार नाही, तर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (हत्येचा प्रयत्न) आणि ८९ (सक्तीचा गर्भपात) सारखी अतिशय गंभीर कलमे लावली आहेत. शिवाय तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
पीडितेचे राजकीय वजन आणि संशयिताचे (Suspected) सामाजिक स्थान यामुळे शहर पोलिसांनी या कारवाईत प्रचंड गोपनीयता पाळली होती. मात्र, न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) मिळाल्याने आता हा प्रकार उघड झाला आहे. सन २०२१ पासून हा प्रकार सुरू होता. गच्चीवरून ढकलण्याचा प्रयत्न आणि तासन् तास उभे करून छळ के ल्याचे ही लोकप्रतिनिधीने तक्रारीत म्हटले आहे. अखेर माहेरच्या मंडळींच्या मदतीने हा ‘बंद दाराआडचा’ छळ समोर आला आहे.




