Friday, September 11, 2026
Homeक्राईमNashik Crime : पंचवटीत गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; गुन्हे शोध पथकाची कारवाई

Nashik Crime : पंचवटीत गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; गुन्हे शोध पथकाची कारवाई

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पंचवटी गुन्हे शोध पथकाला (Panchvati Crime Unit) महत्त्वाचे यश मिळाले आहे. कुमावत नगर परिसरात देशी बनावटीच्या पिस्तुलसह फिरत असलेल्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि रिकामी मॅगझीन जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना पोलीस शिपाई अंकुश काळे यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार कुमावत नगर पाटा परिसरात एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे समोर आले. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ आणि त्यांच्या पथकाने कुमावत नगर पुलाजवळ सापळा रचला.दरम्यान, पोलिसांना पाहताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख कुणाल महिंद्र चव्हाण (वय १९, रा. गणेश चौक, कांतीनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) अशी पटली. झडतीदरम्यान त्याच्या कमरेला लावलेला लोखंडी गावठी कट्टा आणि मॅगझीन जप्त करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ पुढील तपास करत आहेत. या कारवाईत महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, कैलास शिंदे, अमोल काळे, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, योगेश वायंकडे, नितीन पवार, आगोणे आणि रोहिणी भोईर यांचा समावेश असलेल्या पथकाने सहभाग घेतला.

ताज्या बातम्या