नाशिक | भारत पगारे | Nashik
सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) जनजागृती सुरू असल्याने बहुसंख्य नागरिक व तरुण सायबर साक्षर झाले आहेत बहुदा होत आहेत. असे असतानाही उच्चशिक्षित सायबर चोरटे त्यांनाही जाळ्यात ओढत असून यात डॉक्टर, उद्योजक, सेवानिवृत्तांसह वयोवृद्ध महिलांचा (Woman) सहभाग अधिक आहे. अद्ययावत तपास यंत्रणा आणि लॅब असतानाही सायबर गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेने वाढतेच आहे. त्यामुळे आता आपणच अधिकाधिक सतर्कता बाळगणे हाच त्यावरील शेवटचा उपाय असल्याचे अधोरेखित होत आहे.
नाशिकमध्ये (Nashik) मे २०२५ अखेर १२५ जणांना अडीच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हे देशभरात घडत आहेत. त्यानुसार मुंबई, नाशिक, नोएडा, जमतारा, जम्मू, दिल्ली, गाजियाबाद व अन्य ठिकाणी सायबर नेक्सस चालविणाऱ्या संशयितांनी (Suspected) खासगी कॉल सेंटर, सायबर सेल व लॅब उघडून हुशार लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. बी. टेक, एम. टेक व आयआयटी शिक्षण झालेले काही तरुण-तरुणी सायबर फ्रॉडच्या नेक्ससचे सदस्य असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले असून सायबर गुन्ह्यांचे जाळे नाशिक, मुंबई, नागपूर, ठाणे व भारतासह थेट कंबोडिया व इतर देशांत विस्तारले गेले आहे. त्यातच अधिकाधिक तपास झाला तरी मुख्य सेंटरच हाती लागत नसल्याने गेलेले कोट्यवधी रुपये परत मिळणे अशक्य होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास झाला किंवा नाही झाला, तरी काही हाशील नाही, अशी ओरड कानी पडू लागली आहे.
नाशिक शहरात (Nashik City) सन २०१५ पासून २०२४ अखेर सायबरसंबंधी ९८९ गुन्हे दाखल झाले. मात्र त्यात केवळ अकराच संशयितांना अटक (Arrested) झाली आणि ते जामीनावर आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याचे प्रमाण अत्यल्प असून, सायबर पोलिसांचे हे अपयश असल्याचे दिसून येते. हे चोरटे होम अरेस्ट, ओटीपी-पासवर्ड, सेक्सटॉर्शन, शेअर ट्रेडिंग आदी २२ प्रकारांतून गंडा घालत आहेत. पोलिसांकडे अद्ययावत तपास यंत्रणा व इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी), डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय), सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा व मुंबई आणि पुण्यातही या डिजिटल प्रयोगशाळा आहेत. प्रत्येक शहरात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे आहेत. मात्र, तरीही गुन्हा निष्पन्न करून चोरट्यांना बेड्या ठोकण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे.
चोरट्यांचे पाऊल पडती पुढे…
आतापर्यंतच्या सायबर गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करता, त्यात गुन्ह्यांची पद्धत पोलीस यंत्रणेला उमगण्याअगोदर दुसऱ्या नव्या पद्धतीने सायबर चोरटे नागरिकांना गंडवित असल्याचे प्रकर्षान दिसून येते. याच कारणांमुळे मागील बारा ते तेरा वर्षांपासून वर्षांपासून सायबर चोरटे आणि पोलिसांच्या पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे. २०१५ ते २०२४ या काळात राज्यात ५४ हजार ८०९ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील फक्त १५ हजार १४५ चोरट्यांनाच बेड्या ठोकण्यात यश आले असून, तब्बल ३९ हजार ६६४ सायबर चोरटे अजूनही मोकाटच आहेत.
सायबर गुन्हेगारांचे नेटवर्क परदेशात असल्याने तपासाला मर्यादा येतात. याशिवाय देशांतर्गत गुन्ह्यांमध्ये संशयित इतर राज्यांमधून गुन्हे करतात. त्यामुळे सायबर चोरट्यांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहेत. बँकिंग प्रणालीतदेखील काही बदल अपेक्षित आहेत. एका व्यक्तीच्या नावे एकच मोबाईल सीमकार्ड हा नियम हवा.
सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम
दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत अटकेतील संशयित उणे
| वर्ष | दाखल गुन्हे | निष्पन्न | संशयित अटक |
| २०१५ | २,१२७ | ५७९ | ८८० |
| २०१६ | २,३३३ | ७९९ | १,३०० |
| २०१७ | ३,६८५ | १,१२० | १,४७८ |
| २०१८ | ३,६७० | १,२३८ | १,६३६ |
| २०१९ | ४,८९८ | १,२३५ | १,५१५ |
| २०२० | ५,६५७ | १,३३५ | १,६०३ |
| २०२१ | ५,५६२ | १,३७३ | १,७०६ |
| २०२२ | ८,२४४ | १,३५७ | १,४५८ |
| २०२३ | ८,१६७ | १,४२२ | १,६०२ |
| २०२४ | १०,४६६ | १,९३६ | १,९६७ |




