नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘क्रिप्टोकरन्सी’ खरेदीत वाढीव नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका खासगी नोकरदाराला तब्बल १५ लाख ६९ हजार ७८ रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. ‘यूएसडीटी’ (टिथर) बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करून देतो, असे सांगत संशयितांनी (Suspected) विश्वास संपादन केला आणि क्युआर कोडच्या माध्यमातून तक्रारदाराच्या ट्रस्ट वॉलेटवर डल्ला मारला. सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराला ऑक्टोबर २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संशयित योगेश आणि सागर (राहणार पुणे,) या अनोळखी व्यक्तिंनी संपर्क साधला. यूएसडीटी विक्रीत जादा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांनी क्युआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. संबंधित कोड स्कॅन करताच डिजिटल ट्रस्ट वॉलेटला प्रवेश मिळवून त्यातील १६, हजार ६०४ ‘यूएसडीटी अन्य वॉलेटमध्ये वर्ग करण्यात आले.
क्रिप्टो व्यवहार तत्काळ आणि अपरिवर्तनीय असल्याने व्यवहार रद्द करता येत नाही. हीच बाब संशयितांनी (Suspected) साधली. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडिताने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलीस संबंधित मोबाईल क्रमांक आणि वॉलेट आयडींच्या आधारे तांत्रिक तपास करत असून पैशांचा डिजिटल ट्रेल शोधण्याचे काम सुरू आहे, असे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.
यूएसडीटी (टिथर) म्हणजे काय?
यूएसडीटी ही एक स्टेबलकॉईन प्रकारातील क्रिप्टोकरन्सी आहे. तिची किंमत साधारणतः १ अमेरिकन डॉलर इतकी स्थिर ठेवली जाते. जागतिक क्रिप्टो एक्स्चेंजवर खरेदी-विक्री, ट्रेडिंग आणि निधी ट्रान्सफरसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो व ती डिजिटल वॉलेटमध्ये साठवली जाते. व्यवहार ब्लॉकचेनवर नोंदले जातात आणि एकदा पूर्ण झाल्यावर रद्द करणे कठीण असते. फसवणूक प्रकरणांत ‘जादा नफा’ किंवा ‘ऑफ-मार्केट डील’चे आमिष देऊन वापरली जाते.





