नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात तोतया पोलिसांनी (Fake Police) वृद्धांसह ज्येष्ठांना लक्ष करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने (Gold Ornaments) पळवून नेल्याच्या घटना मंगळवारी (दि.११) सकाळच्या सुमारास घडल्या. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा तोतया पोलीस (Police) ‘ऑनफिल्ड’ रस्त्यावर उतरल्याचे चित्र असून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकरोड (Nashik Road) येथील लॅमरोड परिसरातील रहिवासी अंजना बाबुराव गायकवाड (७५) यांच्या फिर्यादीनुसार, त्या मंगळवारी पखाल रोडवरून सकाळी आठच्या सुमारास जात होत्या. त्यावेळी तीन भामट्यांनी अंजना यांना थांबवत ‘आम्ही पोलीस खात्यातील असून आज सकाळी या ठिकाणी वृद्धेचा खून झाला आहे. आम्ही येथे सुरक्षेसाठी थांबून आहोत, गस्त घालत आहोत. तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा’, असे भामट्यांनी अंजना यांना सांगितले.
त्यामुळे अंजना यांनी बांगड्या, पोत असा सुमारे साडे सहा तोळे वजनाचे १ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने अंगावरून काढले. त्यावेळी तोतया पोलिसाने दिलेल्या कागदात दागिने ठेवताना हातचलाखीने कागदात बनावट दागिने ठेवले तर अंजना यांच्याकडील दागिने स्वतःकडे ठेवत पसार झाले. अंजना यांनी पिशवी तपासली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात (Mumbai Naka Police Station) फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास समर्थनगगर येथील जगन्नाथ चौक ते रामेश्वर महादेव मंदिरादरम्यान, दोघा भामट्यांनी विष्णुसा अर्जुनसा भारद्वाज (७५, रा. वडाळा पाथर्डी रोड) यांना गंडा घातला. आम्ही पोलीस आहोत, असे म्हणून अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. त्यानंतर भामट्यांनी हातचलाखी करून २ लाख १ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे व हिऱ्याचे दागिने काढून नेले. इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रिक्षाचालकास गंडा
एका चोरट्याने वृद्ध रिक्षाचालकास बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांच्याकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल नेल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. वसंत सुदाम पाटील (६६, रा. साईबाबा नगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने २५ फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास बोलण्याच्या बहाण्याने गुंतवून ठेवत मोबाइल लंपास केला. पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.