नाशिक | Nashik
मागील वादाची खून्नस, राग आणि परिसरातीस वर्चस्व सिद्ध करण्याच्या चढाओढीतून सराईत गुन्हेगारांनी दाेघा सख्ख्या (Two Brothers) भावांवर धारदार हत्यारांनी सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. बुधवारी(दि. १९) सायंकाळी रंगाेत्सव शांततेत साजरा झाला असतानाच, रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान, पुणे राेडवरील बाेधलेनगरानजिकच्या आंबडेकरवाडीत ही खळबळजनक घटना घडली. त्यानंतर आंबेडकरवाडी, बनकर चाैक व जिल्हा शासकीय रुग्णालयात माेठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे वरील ठिकाणांवर दंगल नियंत्रण पथकासह अतिरिक्त बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, गुन्हेशाखा युनिट एकने या गुन्ह्यातील पाचही संशयितांना (Suspected) घटनेनंतर सहा ते आठ तासांत गजाआड केले आहे.
उमेश उर्फ मन्ना भगवान जाधव (वय ३२) व त्याचा धाकटा भाऊ प्रशांत भगवान जाधव (वय ३०) अशी दुहेरी खुनाच्या (Murder) घटनेतील मृत भावंडांची नावे आहेत. याबाबत मृत जाधव बंधूंचे मामा विनाेद पवार(रा. प्रभू एम्पाअर साेसायटी, रविशंकर मार्ग, पुणे राेड) यांनी संशयित सागर मधुकर गरड (वय ३२वर्षे, रा- आंबेडकरवाडी उपनगर), अनिल विष्णू रेडेकर(वय-४० रा- उत्तरानगर, तपोवनरोड, नाशिक), सचिन विष्णू रेडेकर(वय-४४, रा. गायत्री नगर, पुणेरोड, नाशिक), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे(वय-२६, रा- सर्वेश्वर चौक, उत्तमनगर, नवीन सिडकाे) व योगेश चंद्रकांत रोकडे(वय-३०, रा आंबेडकरवाडी) यांच्याविराेधात उपनगर पाेलिसांत (Upnagar Police) फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयितांना अटक करण्यात आली आहे.
विनोद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजता बनकर चौकातील पिठाच्या गिरणीजवळ जाधव बंधू तसेच नितीन हटकर, मयूर भोये, आदित्य, विनोद पवार हे आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासाठी चर्चा करत होते. या दरम्यान रात्री ९.३० वाजता उमेशला त्याची आई अंजना यांनी ‘जेवण करण्यासाठी घरी ये’ असा फोन आला. ताे घरी जात असताना येथील सार्वजनिक शौचालयाजवळून घरी जात असताना घराच्या अंगणाजवळ संशयितांनी कुरापत काढून चाकू, काेयता व कुकरीसदृश हत्यारांनी त्याच्या डाेके, ताेंड, पाेट व पाठीवर सपासप वार केले. ही घटना पाहून उमेशचा भाऊ त्याला वाचविण्यासाठी घराबाहेर आला असता, संशयितांनी त्याच्यावरही सपासप वार करुन खून केला. यानंतर, मारेकरी दुचाकींवर बसून पळून गेले. त्यानंतर जाधव बंधूंना सहकाऱ्यांनी रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून दाेघांना मृत घाेषित केले.
दरम्यान, माहिती कळताच, पाेलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आंबेडकरवाडीत तणावाचे वातावरण होते. तसेच जिल्हा रुग्णालयात (District Hospital) शोकाकूल नातेवाईक तसेच मित्र परिवाराने गर्दी केली हाेती.