नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘महसूल’ नियम फाट्यावर मारुन मनमानी पद्धतीने वाळू उपसासंदर्भात वन गुन्हा नोंदवून जप्त हायवा डंपर सोडण्यासाठी पस्तीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या त्र्यंबकमधील (Trimbak) हरसूलच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह (रेंजर) वनपालास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. दरम्यान, दोघांनाही नाशिक न्यायालयाने (Nashik Court) दोन दिवसांची (दि. ५) पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली असून, दोघांच्या घरझडतीतून लाखो रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त केली आहे.
कैलास नवनाथ सोनवणे (रा. नाथकृपा, बिस्तबाग, महलजवळ, तपोवनरोड, अहिल्यानगर) असे संशयित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून, सुनील बाळासाहेब टोंगारे (रा. देवश्री, ए. टी. पवार आश्रमशाळेजवळ, बोरगड, म्हसरूळ, नाशिक) असे संशयित वनपालाचे नाव आहे. तक्रारदाराच्या हायवा डंपरवर बेकायदा वाळू उपसा केल्याच्या संशयावरून वन गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा डंपर सोडण्यासाठी सोनवणे याने संगनमताने ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर, तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB) तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
त्यानंतर शुक्रवारी (दि. २) रात्री पथकाने हरसूल (Harsul) वनपरिक्षेत्र कार्यालयात दोघांनाही पस्तीस हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली. अटक केल्यानंतर शनिवारी दोन्ही संशयितांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा सरकारी व बचाव पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. त्यात लाचेचे कारण, वनगुन्हा, अधिकार नसताना मनमानी पद्धतीने दंड आकारणी आदींसह इतर मुद्यांवरुन न्यायालयात खडाजंगी झाली. तपास पथकाचे मुद्दे विचारात घेता न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, नाशिक एसीबी दोघांचीही उघड चौकशी करणार असल्याचे समजते.
एस्क्रॉस, किया कार जप्त
शनिवारी (दि. ३) नाशिक व नगरच्या पथकांनी झडतीदरम्यान दोघांच्या घरांतून कार, दुचाकी, मोपेड अशी वाहने तसेच फ्लॅट स्वरूपातील स्थावर मालमत्ता जप्त केली. या कारवाईमुळे संशयितांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांबाबतही चौकशीचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे. नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल चौधरी तपास करत असून, वनगुन्ह्यांच्या नावाखाली दोघांचे वसुलीचे आणखी उद्योग उघड होण्याची शक्यता आहे. सोनवणेचे अहिल्यानगरमधील नाथकृपा रो हाऊस, एक एस्क्रॉस कार, दुचाकी व स्कूटी आणि टोंगारेकडून किया कार, दुचाकी, निवासी फ्लॅट अशी मालमत्ता जप्त करण्यात आली.




