नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उच्चशिक्षित तरुणाला (Youth) प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून तब्बल चोवीस लाख रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पाच वर्षांपूर्वी पैसे घेतल्यानंतर कोणत्याही स्वरुपाची नोकरी न मिळाल्याने मुलासह वडिलांनी पोलिसांत (Police) धाव घेतली. त्यानुसार चार संशयितांविरुद्ध अंबड पोलिसांत (Ambad Police) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सातपूर येथील समुद्रनगरात राहणाऱ्या पुंजाबा नामदेव सोनवणे (वय ५९) यांनी अंबड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास ठाकूर, छगन अग्रवाल, पवन भुतडा व उज्वला वठारक या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सन २०२० मध्ये सोनवणे यांची संशयितांशी कामानिमित्त भेट झाली होती. संशयितांनी सोनवणे यांचा विश्वास संपादित करुन त्यांच्या मुलाला (Son) आरटीओमध्ये उपनिरीक्षक पदावर नियुक्तीचे आश्वासन दिले.
त्यासाठी विविध बँक खात्यात सोनवणे यांनी २४ लाख २० हजार रुपये जमा केले. मात्र, पाच वर्षे उलटल्यानंतरही संशयितांनी सोनवणे यांचा मुलगा वैभव याला कोणतीही नोकरी लावली नाही. त्यामुळे सोनवणे यांनी रक्कम पुन्हा मागितली. त्यावर वैभवच्या नावे बनावट नियुक्तीचा ‘ई-मेल’ संशयितांनी पाठविला. त्या ई-मेलद्वारे चौकशी केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप शेवाळे पुढील तपास करीत आहेत.