नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत लोखंडी रॉडने मारहाण करून खून करणाऱ्यांना चौघांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत (दि.८ एप्रिल २०२३) सकाळी ११ वाजेच्या सुमारास गॅलक्सी हॉस्पीटल त्रिमूर्ती चौक येथे निलेश दिनकर ढोके (३३ रा. पार्थ रो हाऊस, विठ्ठलनगर, कामटवाडा नाशिक), प्रसाद शिरीष मुळे (३१ रा. मंगलशक्ती अपार्टमेंट, इंदिरानगर नाशिक), सतिष अप्पा आहिरे (३६ रा.एन ४१ व्ही सीए ४/१४ अष्टविनायक चौक, सावतानगर, सिडको नाशिक) पल्लवी निलेश ढोके (२६ रा. पार्थ रो हाऊस ८ विठ्ठलनगर कामटवाडा नाशिक) यांनी गॅलक्सी हॉस्पीटल, त्रिमूर्ती चौक, नवीन नाशिक येथील रोडवर, यांनी फिर्यादी गणपत रामभाऊ जाधव (६० रा. मु. पो. हिसवाळ ता. नांदगांव जि. नाशिक) यांचा मुलगा मयत नितिन गणपत जाधव यांस “तु पल्लवी ढोके हिला फोन का करतो.?” या कारणांवरून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
त्यानंतर त्यांनीच नितीन याला उपचारासाठी डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल आडगांव येथे दाखल केले होते. त्यानंतर (दि. २३ एप्रिल २०२३) उपचारादरम्यान नितीन याचा मृत्यू (Death) झाला म्हणून आरोपींविरोधात अंबड ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास उपनिरीक्षक सुनिल बिडगर , प्राथमिक तपास हवालदार रविंद्रकुमार पानसरे यांनी केला असून त्यांनी आरोपींविरुध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक ०३, नाशिक आर. एन. पांढरे यांनी या गुन्हयातील आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
दरम्यान, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी कामकाज केले. तसेच उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, प्रभारी अभियोग कक्ष, पैरवी अंमलदार, हवालदार आर.बी. आलगे, व कोर्ट अंमलदार, श्रेणी उपनिरीक्षक जयवंत गुळवे, हवालदार रंजना गायकवाड यांनी या गुन्हयात शिक्षा (imprisonment ) लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.




