नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बनावट नावाने फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून भगूर (Bhagur) येथील साठ वर्षीय महिलेशी (Woman) ओळख वाढवून थेट तिचे घर गाठणाऱ्या बहुरुपी विनय भिडेने फसवणुकीचा (Fraud) कहर केल्याची घटना उघडकीस आली आहे. भिडे याने महिलेचा विश्वास संपादन करत दिशाभूल करुन ‘तुमचे दागिने बदलून आणून देतो’ असे सांगून सव्वातीन लाख रुपयांचे अलंकार ताब्यात घेऊन लंपास केले आहेत. केवळ फेसबुकवरील ओळख व त्यातून मोबाईलवर झालेल्या संभाषणातून फसवणुकीची ही दुहेरी घटना घडल्याने तिची चर्चा सुरु झाली आहे.
भगूर येथील बसस्टॅन्डजवळ (Bus Stand) साठ वर्षीय महिला साडी व कापड विक्रीचा व्यवसाय करते. तिचा पती एका व्याधीशी झगडत असून ‘बेडरेस्ट’ आहे. दरम्यान, वयोवृद्ध महिला घरी नियमित काम करत असताना, काही दिवसांपूर्वी तिची ओळख विनय भिडे या संशयित प्रोफाईल धारकाशी झाली. त्याने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविल्यानंतर महिलेने अॅक्सेप्ट केली असता दोघांचे संभाषण सुरु झाले. त्यानंतर ओळख वाढत गेली व मोबाईलवर बोलणेही सुरु झाले.
दरम्यान, फेसबुक यूजर विनय भिडे ३१ जुलै रोजी थेट महिलेच्या घरी पोहोचला. त्याने तिला ओळख देऊन विचारपूस केली. तेव्हा महिलेचा पती, नणंद व मोलकरीण महिला घरात होती. सर्वांशी बोलणे झाल्यावर भिडे याने उपस्थितांसह महिलेशी संवाद साधला व काही बाबींचे आमिष दाखविले. तेव्हा त्याने, पीडित महिलेस ‘तुमचे दागिने खूप काळवंडले आहेत, ते नवीन करुन देतो’, असे सांगितले. महिलेने ओळख असल्याने विश्वास ठेवला व घरातील व अंगावरील दागिने त्याच्या स्वाधीन केले.
यानंतर, भिडे याने महिलेस ‘दोन तासांत हे दागिने पॉलीशसह नवे करुन आणतो’, असे सांगून घरातून काढता पाय घेतला. मात्र, दागिने दिल्यानंतर तीन तास उलटूनही परत न मिळाल्याने महिलेची धाकधूक वाढली. तिने शोध घेतला असता यश आले नाही. त्यानंतर संबंधित फेसबूक आयडी व मोबाईल नंबर (Mobile Number) तपासला असता तो देखील बंद आढळून आला. त्यामुळे फसवणूक झाल्याची जाणीव होताच, महिलेने देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्याकडे वाच्यता केली. त्याच्या सूचनेने तत्काळ विनय भिडे नावाच्या संशयित प्रोफाईलधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रवीण देवरे करत आहेत.
सतर्क रहा
प्रोफाईलमधील विनय भिडेचा फोटो व प्रत्यक्ष घरी आलेल्या व्यक्तिचा चेहरा सारखाच असल्याचे समोर येत असून त्याची ओळख पटण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास केला जात आहे. या प्रकाराने भगूरकर आचंबित झाले असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. एका हिंदी चित्रवाहिनीतील मालिकेत घडलेला प्रसंग भगूर परिसरातील महिलेशी घडल्याने त्याची चर्चा वाढत आहे.
ठळक मुद्दे
- तीन लाख, २५ हजारांचे दागिने लंपास
- दीड लाखांची पाटली, दीड लाखांच्या बागंड्यासह अंगठीचा समावेश
- संशयिताचे वय ५०-५५ च्या आसपास
- भरदुपारी चार ते सहा वाजेची घटना
- अनोळखी व्यक्तीशी संपर्क करणे बेतले
- बनावट ओळखीनंतर महिलेची गंडा घातल्याने दुहेरी फसवणूक
- सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास सुरु





