नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दुचाकी व जबरी चोरी करणाऱ्या तीन संशयितांना गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) ताब्यात घेतले असून यात दोघा विधिसंघर्षित बालकांचा सहभाग समोर आला आहे. या तिघांनी संगनमताने दोन दुचाकी चोरल्याची (Thief) कबुली दिली आहे. तसेच शहरात सात व परजिल्ह्यात दोन जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिघांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अनिकेत ऊर्फ अंड्या पप्पू शार्दूल (२०, रा. गोवर्धन गाव, गंगापूर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासोबत इतर दोन विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगापूर रोडवरून रोहिणी पी. पाटील या दुचाकीवरून रविवारी (दि. ४) रात्री जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेली होती.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल आहे. गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासास सुरुवात केली. अंमलदार राकेश राऊत व तुळशीदास चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार व सीसीटीव्हीच्या आधारे पथकाने गंगापूर परिसरात सापळा रचून तिघांना पकडले. तिघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांनी जबरी चोरी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली.
सराफाकडून दागिने जप्त
जबरी चोरीचे गुन्हे केल्यानंतर विधीसंघर्षितांनी सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील सराफ व्यावसायिक विलास प्रमोद विसपुते यास सोन्याचे दागिने विक्री केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी विसपुते याच्याकडून ३ लाख ९५ हजार ७०० रुपयांचे सुमारे चार तोळे वजनाची सोन्याचे लगड जप्त केल्या आहेत. तर सहा गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने जप्त करणे बाकी आहे.
विधिसंघर्षितांनी केली जबरी चोरी
संशयित अनिकेत याच्यासह विधिसंघर्षितांनी मिळून शहरात (City) सात ठिकाणी जबरी चोरी केल्याचे समोर आले. तर पुणे येथील चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही दोन जबरी चोरी केल्याचे उघड झाले. जबरी चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकीही संशयितांनी सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे संशयितांनी सांगितले. पोलिसांनी सखोल तपास करत संशयितांकडून दोन दुचाकी व सोन्याची लगड असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार गिरीश महाले, रवींद्र मोहिते, अंमलदार गोरख साळुंके, सोनू खाडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.