नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबईतील नामांकित ‘मलबार गोल्ड अँन्ड डायमंड’ ने नाशिकमधील (Nashik) एका कुरिअर कार्यालयाकडे पाठविलेले दहा लाखांचे गोल्ड कॉइन ‘डिलिव्हरी’ दरम्यान संशयास्पदरित्या गायब झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणचे हे कॉइन नेमके कुणी, का व कसे ऑर्डर केले, यातही एकवाच्यता आढळली नसून प्रकार संशयास्पद असल्याने तपास सुरु झाला आहे. संशयाची सुई डिलिव्हरी बॉयकडे वळली असून आता सायबर पोलिसांनी मलबार गोल्डला पत्रव्यवहार केला आहे. डिलिव्हरी बॉयसह ‘कॉलिंग संदर्भात सर्वच सीडीआर काढले जात आहे.
मलबार गोल्डच्या प्रतिनिधींनी (दि. २३) नाशिक सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत मलबार गोल्ड अॅण्ड डायमंडच्या वेबसाईटवरून नाशिकमधील एका कुरिअर कार्यालयाकडे सहा वेगवेगळ्या नावांनी नऊ लाख ८७हजारांचे सोन्याचे कॉइन ऑर्डर करण्यात आले. सर्व शिपमेंटमध्ये कॉइन असल्याचे नमूद होते. या सहा पार्सलसाठी वेगवेगळे ट्रॅकिंग नंबर वापरण्यात आल्याचे आता उघड झाले असून शिपमेंटसाठी ‘राज पटेल’, ‘सलोनी चव्हाण’, ‘नितीन कोकणी’ व ‘अवतल असे’ अशी नावे वापरण्यात आली.
हे देखील वाचा : Nashik News : ‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच; वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
विशेष बाब म्हणजे, या सर्व ऑर्डरसाठी भिन्न व अनोळखी मोबाईल क्रमांक नोंदविण्यात आले. तसेच, डिलिव्हरीच्या वेळी संपर्कासाठी अनोळखी इसमांचे मोबाईल क्रमांक वापरण्यात आले आहेत. यानंतर, कुरिअर कार्यालयातील (Courier Office) एकाच डिलिव्हरी बॉयने सहा पार्सल ताब्यात घेऊन दिलेल्या पत्त्यावर डिलिव्हरीसाठी जात असल्याचे नमूद केले. मात्र, डिलिव्हरी पूर्ण न करता पार्सल ‘डिलिव्हरी कॅन्सल’ झाल्याचे कारण सांगत परत आणले. त्यानंतर पार्सल जमा करुन ते मलबारला परत करण्यात आले.
मलबारने परत आलेले ‘पार्सल’ तपासले असता, त्यात कॉइन आढळले नाही. त्यामुळे कंपनीने आर्थिक फसवणूक व विश्वासघात झाल्याने तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी मालबार गोल्ड अँड डायमंड कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. ऑर्डर देताना वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, कॉलिंग पॅटर्न, तसेच डिलिव्हरी बॉय व संबंधित व्यक्तींचे सीडीआर काढण्यात येत आहेत. शिवाय, कु रिअर कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेजचीही तपासणी सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.
नेमके कसे घडले?
डिलिव्हली बॉय सहा पार्सल (शिपमेंट) घेऊन निघाला. रस्त्यात असताना त्याला अनोळखींचे फोन आले. त्याला शहरातील एका भागात बोलावून घेण्यात आले. संबंधितांनी ओटीपी पुरविले. तसेच हे पार्सल ‘नको’ म्हणून कॅन्सल केले. तो हे पार्सल घेऊन कुरिअर कार्यालयात आला. त्याने जमा केले असता, कुरिअरने पुन्हा मलबारला पाठविण्यात आले. मलबारनचे पार्सल तपासले असता त्यात काहीही आढळले नाही. त्यामुळे डिलिव्हरी दरम्यान नेमके काय घडले, क्वॉइन कुणी ऑर्डर केले, पार्सल ज्यांच्या नावे आहेत, त्यातील एकाने बुकिंग केलीच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा झोल नेमका काय याचा तपास सुरु झाला आहे.
मुद्दे
- डिलिव्हरी मूळ पत्त्यावर पोहोचताना गडबड
- डिलिव्हरी बॉयला अनोळखी व्यक्तिंचे फोन आल्याचा दावा
- रस्त्यातच पार्सल फोडून क्वॉइन लांबविल्याचा संशय
- डिलिव्हरी बॉयची भूमिका संशयास्पद, ओटीपी पडताळणार




