नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नांदूरनाका (Nandur Naka) येथील जनार्दननगरात घडलेल्या राहुल धोत्रे (Rahul Dhotre) या तरुणावरील प्राणघातक हल्ल्यासह खून प्रकरणात (Murder Case) नावे समोर आलेल्या काही संशयितांना अटक झाल्यावर ते न्यायालयीन कोठडीत असतानाच इतर मुख्य संशयित मागील सतरा दिवसांपासून पसारच आहेत. त्यातच संशयित उद्धव निमसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, या ‘अटकपूर्व’ चा निर्णय बुधवारी (दि.१०) न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या न्यायालयात होणार असल्याचे समजते.
निमसेंचे शेवटचे लोकेशन पेठरोडवर (Peth Road) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आडगाव पोलिसांच्या हद्दीतील छत्रपती संभाजीगर रोडवरील नांदूर नाका येथे २२ ऑगस्ट रोजी निमसे गटाने (Nimse Group) धोत्रे गटावर प्राणघातक हल्ला चढविला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल संजय धोत्रे या तरुणाचा शुक्रवारी (दि.२९) उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर, परिसरात तणावाचे वातावरण पसरुन संशयितांवर कठोर कारवाईची मागणी पुढे आली होती.
त्यानुसार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी खून प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अंबड विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या निरीक्षणात एसआयटीची (SIT) स्थापना केली. एसआयटीकडून तपास सुरु असतानाच काही प्रकरणातील संशयित पसार असल्याने त्यांच्या शोधार्थ पाच पथके रवाना आहेत. मात्र, सतरा दिवस उलटूनही संशयितांना पकडण्यात पथकांना अपयश आल्याचे दिसते.
दरम्यान, आडगाव पोलिसांनी दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पूर्वीच संशयित सुधीर ऊर्फ गोटीराम माधवराव निमसे, अक्षय अशोक पगार, मेघराज सुनील जोजारे, गणेश राजाभाऊनिमसे, रोशन लक्ष्मण जगताप, संतोष बाळू मते व स्वप्निल मदन बागुल यांना अटक आहे. काही संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत.
उद्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
या प्रकरणात ‘मला नाहक गोवल्याचा’, दावा उद्धव निमसे यांनी पूर्वीच केला असून ‘अटक होऊ नये’, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचा युक्तीवाद न्या. जमादार यांनी ऐकून घेतला असून अटकपूर्व जामीन मंजूर करण्याचा निर्णय व सुनावणी येत्या १० सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे निमसेंना अद्याप दिलासा मिळाला नसून त्यांची पळापळ सुरुच आहे. तर, निमसे हे छ. संभाजीनगर, मुंबई, किंवा सूरत येथे असण्याची दाट शक्यता व्यक्त करुन पोलिसांनी माग काढण्याचा प्रयत्न केला आहे.





