Monday, December 2, 2024
HomeUncategorizedNashik Crime : मिसिंगच्या तपासात अपहरण उघड

Nashik Crime : मिसिंगच्या तपासात अपहरण उघड

शेअर ब्रोकरची पोलिसांकडून सुटका; तीन अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जादा आर्थिक परताव्याच्या आमिषाने शेअर ट्रेडिंगसह मार्केटमध्ये गुंतवलेल्या काही रकमेपैकी ५० लाख रुपये परत मिळवण्यासाठी ब्रोकरचे अपहरण (Kidnapping) करून खंडणी मागणाऱ्या आठ जणांचा इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) पर्दाफाश केला. तब्बल नऊ दिवस या ब्रोकरला एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तपास करत या सोसयटीत पोहोचून घटनास्थळावरून तिघा खंडणीखोर अपहरकर्त्यांना अटक (Arrested) केली. या घटनेने खळबळ उडाली असून संशयितांत दोन बांधकाम व्यावसायिकांसह एका सराईताचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

- Advertisement -

गणेश आनंदा काळे (३५, रा. वरद, गणेशा व्हॅली, सिन्नर फाटा नाशिक) असे सुटका झालेल्या अपहृत शेअर ब्रोकरचे नाव आहे. तर या प्रकरणी संशयित कांतीलाल वामजा, मिहिर वामजा, आकाश वानखेडे, उमेश नवनाथ सरवर (१९ रा. पांडुरंग रो हाऊस, हॉटेल एसएसके समोर, पाथर्डी शिवार), विनायक जाधव (१८, रा. पोलीस वसाहत, आनंदनगर, पाथर्डीफाटा), मुकेश भाऊसाहेब शिंदे (२२, रा. ढेमसे गल्ली, शिवाजी चौक, पाथर्डी गाव) आणि जयेश सोनवणे यांच्यावर खंडणी व अपहरण केल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलिसांत (Police) दाखल करण्यात आला आहे.

वामजा हे बांधकाम व्यावसायिक असून, उमेश सरवर हा शहरातील रेकॉर्डवरील सराईत संशयित आहे. गणेश काळे यांच्या फिर्यादीनुसार, ते शेअर ब्रोकर असून गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून व्यवहार करतात. त्यातच काही महिन्यांपासून त्यांनी शहरातील अनेक बड्या व्यावसायिक व उद्योजकांकडून पैसे घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवले आहेत. त्यानुसार ओळखीतून कांतीलाल व मिहिर वामजा यांनी काळे यांच्याकडे लाखो रुपये गुंतवले होते. त्यातील पंधरा लाख रुपयांचा परतावा काळे यांनी दिला आहे.

दरम्यान, गुंतवलेल्या रकमेपैकी ५० लाख रुपये वसूल करण्यासाठी वामजा यांनी सराईत संशयित उमेश सरवर याला काळेंना ठार मारण्यासाठी सुपारी दिली. त्यानुसार सरवरने वरील पाच संशयितांच्या मदतीने मंगळवारी (दि. १९) काळे यांना सेटलमेंट करण्याच्या उद्देशाने पाथर्डी फाटा भागात बोलावून घेत कारमध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर त्यांना वामजा यांच्या पाथर्डी-गौळाणे रोडवरील निर्माणाधीन बांधकाम साईटवर नेत एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून बेल्ट व लाठीने मारहाण केली. घटनास्थळावरून अटक केलेले सरवर, जाधव व शिंदे यांना न्यायालयाने पोलीस कोठडी (Custody) सुनावली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. तपास उपनिरीक्षक फुंदे करत आहेत.

घटनास्थळी असे पोहोचले पोलीस

गणेश काळे हे १९ नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबाने याबाबत पोलिसांत मिसिंगची तक्रार नोंदवली होती. या मिसिंगचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांच्या सूचनेने उपनिरीक्षक एस. एस. फुंदे, महिला उपनिरीक्षक सुवासिनी बारेला व पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे बुधवारी (दि. २७) थेट गणेश काळे यांना जेथे डांबून ठेवण्यात आले, त्या सोयायटीत छापा टाकला. तेव्हा काळे हे किरकोळ जखमी अवस्थेत आढळले, तर तीन अपहरणकर्ते संशयित सोसायटीतच आढळून आले. पोलिसांनी त्यांचा ताबा घेत अटक करून काळेंची सुटका केली. काळे हे तब्बल नऊ दिवस अपहरकत्र्त्यांच्या तावडीत होते.

काळेवरही ठकबाजीचा गुन्हा

शेअर ट्रेडिंगमधून जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर ब्रोकर गणेश काळे याने तेजस साहेबराव पगार (रा. तलाठी कॉलनी, ओतूर रोड, कळवण) या तरुणास तब्बल ३९ लाख ७७ हजारांना गंडा घातला आहे. त्याबाबतची फिर्याद पगार यांनी (दि. २७) नाशिकरोड पोलिसांत (Nashik Road Police) दिली आहे. त्यानुसार, काळे याने मे २०२४ मध्ये पगार यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवले. त्यांची पत्नी शरयू पगार यांच्या नावे डिमॅट खात्यावरून १ कोटी ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. ठरल्याप्रमाणे संशयिताने त्यांना ६५ लाख ८ हजार ९९१ रुपयांचा परतावा दिला. परंतु त्यानंतर परतावा दिला नाही. संशयितांकडे मागणी करूनही त्याने परतावा न दिल्याने त्यांची ३९ लाख ७७ हजार ९ रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या