नाशिक | Nashik
आनंदवल्लीतील जमीन मालक (Land Owner) रमेश मंडलिक हत्या तसेच त्यांच्या मालकीचा भूखंड बळकविल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा नवीन सिडकोतील राणेनगरात भूमाफियांचा अतिरेक समोर आला आहे. येथील कोटचवधी रुपयांच्या भूखंडावर राजकीय सराईतांसह भूमाफियांनी (Land Mafia) कब्जा मिळवून मूळ मालकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागून शहरात आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे उघड झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shivsena UBT) नुकताच प्रवेश केलेल्या भूमाफिया पवन पवारसह त्याच्या साथीदार आणि बाऊन्सरवर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, मंडलिक प्रकरणातील बहुतांश संशयित जामीनावर बाहेर आहेत.
मूल उर्फ राजू लखमीचंद लुल्ला, हेमंत पद्माकर चव्हाण, किरण दत्तात्रय वाळके, शकील अहमद नजीर अहमद, पवन पवार, विशाल पवार, प्रविण किशनलाल बेंझ, सुभाष बाबुराव तमखाने, पवन दादाजी जाधव सचिन भास्कर बच्छाव आणि सतिष माणिक भालेराव अशी सराईत भूमाफियांची नावे आहेत. याप्रकरणी लीना प्रकाश लुल्ला (रा. दुबई, मूळ रा. जुह, मुंबई) यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यांच्या कुटुंबाची सन १९९० पासून सियारा हॉटेल्स अॅन्ड ट्युरिझमो प्रा. लि. ही कंपनी असून त्यात लीना, त्यांचे पती प्रकाश व दीर गूल उर्फ राजू लुल्ला हे संचालक आहेत. दरम्यान, सन १९९२ मध्ये लुल्ला कुटुंबाने राणेनगर येथील सर्व्हे नं. ९०३/ ३३/२ मधील २१ हजार १२२ चौरस मीटर मिळकत किसनबाई बाबू सोनवणे व इतरांकडून कायम खरेदी करुन घेतली आहे.
यानंतर, लुल्ला दाम्पत्य व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक झाल्याने, याच संघौचा गैरफायदा घेत त्यांचा दीर गुल लुल्ला याने वरील भूमाफिया संशयितांशी संगनमत करुन संपूर्ण मिळकत हडपण्यासाठी अनेकदा भेटी घेऊन डील फायनल केली. त्यात बनावट कागदपत्रे व दस्त बनवून ही जमीन हेमंत चव्हाण आणि किरण वाळके यांनी खरेदी केल्याचे भासविले. कालांतराने लीना लुल्ला या मिळकतीची पाहणी करण्यासाठी आल्या असता, त्यांना अकल्पित घटना दिसून आल्या. मिळकत आपल्या नावे असतानाही ती दुस-याच्या नावे कशी व संशयितांनी तेथे अतिक्रमण करुन रिकामा कंटेनर ठेऊन गुंडगिरीचा अड्डा बनविल्याचे दिसून आले.
दरम्यान, त्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी पतीसह मिळकतीच्या ठिकाणी गेल्या असता, मालकी हक्क सांगत असतानाच, वरील सर्वच संशयितांनी, लीना व त्यांच्या पतीस धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. त्यावेळी संशयितांनी लुल्ला दाम्पत्यास परत मिळकतीत पाय ठेवायचा नाही, अन्यथा पवन पवार च आमच्याशी गाठ आहे. दरम्यान, या मिळककीबाबत सेटलमेंट करायची असेल तर, याआधी मिळकतीसाठी वापरेलेली रक्कम व ५ कोटी रूपये अतिरिक्त द्यावे लागतील, अशी धमकी दिली.
अशी केली बनवाबनवी
गूल उर्फ राजू लुल्ला याने वरील कंपनीत १० टक्के हिस्सा असतानाही कुटुंबातील कोटध वधी रुपयांची मिळकत नावे हडपण्यासाठी ती हेमंत पद्माकर चव्हाण व इतरांशी संगनमत करुन सन २०२२ मध्ये या मिळकतीची खोटी विसार पावती हेमंत पद्माकर चव्हाण व किरण दत्तात्रय वाळके यांचे नावे लिहून दिली. त्यांच्याकडून काही रकमा स्विकारल्या. याबाबत लुल्ला आणि वाळके तसेच चव्हाण यांचा मिळकतीचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. तसेच, गूल लुल्ला याने शकील अहमद, पवन पवार, विशाल पवार यांच्याशी संगनतम करून मिळकतीचे खोटे दस्त तयार करून बनावट सह्या केल्या. ही मिळकत विक्री करण्याचा अधिकार असल्याचे भासवून लुल्ला याने संशयितांकडून काही रक्कम घेतली आहे. त्याबाबतही प्रकरण न्यायालयात (Court) आहे गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके करत आहेत.
भूमाफियांना महसूलचेच बळ
फेब्रुवारी २०२१ मध्ये गंगापूररोडवरील आनंदवली भागात एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेले रमेश वाळू मंडलिक (वय ७०, रा. आनंदवली) यांची हत्या झाली होती. तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या आदेशाने तपास झाल्यावर गुन्ह्याच्या आधारे पांडे यांनी बदलीपूर्वी महसूल विभागासंदर्भातील ‘लेटरबॉम्ब’ लिहिला होता. राज्याच्या पोलिस महासंचालकांना त्यांनी गोपनीय पत्र पाठवून खळबळ उडवून दिली होती. भूमाफियांना महसूल आधिकाऱ्यांचाच पाठिंबा असून भूमाफिया व आधिकाऱ्यांचे मनसुबे उधळून टाकण्यासाठी पोलिस आयुक्तांनाच जिल्हाधिकारी म्हणजेच जिल्हा दंडाधिकारी घोषित करावे, तसेच कार्यकारी दंडाधिका-यांचे आधिकार पूर्णतः काढून घ्यावेत असे लिहून खळबळ उडवून दिली होती.
त्या प्रकरणात दोघे भाऊ मास्टरमाईंड
मंडलिक हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड रम्मी व जिम्मी राजपूत हे दोघे भाऊ असल्याचे पोलिसांनी तेव्हा सांगितले होते. त्याच्यासह सचिन मंडलिक (३६, रा. मंडलिकनगर, आनंदवली), अक्षय उर्फ अतुल मंडलिक (२६, रा. नवश्या गणपतीजवळ), भूषण मोटकरी (३२, रा. रसोई हॉटेलच्यामागे), सोमनाथ मंडलिक (५०, कॅनलरोड, आनंदवली), दत्तात्रय मंडलिक (४७, कपिला बिल्डींग, सिन्नरफाटा), नितीन खैरे (पद्मदर्शन प्लाझा, आनंदवली), आबासाहेब भंडागे (४१, रा. तुळजाभवानीनगर, पेठरोड), भगवान चांगले (२७, रा. पेठरोड), बाळासाहेब कोल्हे (५४, रा. राजबंगला कॉलनी, गंगापूररोड), गणेश काळे (२५, रा. तुळजामवानीनगर, पेठरोड), वैभव वराडे (२१, रा. तुळजाभवानीनगर, पेठरोड) सागर शिवाजी ठाकरे (२५, रा. गुलमोहर कॉलनी, धृवनगर) आणि जगदीश मंडलिक यांच्यावर गुन्हा दाखल असून सध्या रम्मी राजपूत हा सध्या एका केंद्रीय मंत्र्याच्या विशेष मर्जीतील असल्याचे कळते.